Buzz Aldrin (संग्रहित संपादित प्रतिमा)

माजी अंतराळवीर बझ ऑल्ड्रिन (Buzz Aldrin) हे 1969 मध्ये क्रू-मेट नील आर्मस्ट्राँग नंतर चंद्रावर पाऊल ठेवणारे दुसरे व्यक्ती ठरले होते. आता इतक्या वर्षानंतर बझ ऑल्ड्रिन पुन्हा चर्चेत आले आहेत. ऑल्ड्रिन यांनी शुक्रवारी आपला 93 वा वाढदिवस त्यांच्या ‘दीर्घकालीन गर्लफ्रेंड’सोबत साजरा केला. मात्र यावेळी ऑल्ड्रिन यांनी ट्विटरवर आपल्या लग्नाचीही घोषणा केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी नुकतेच आपल्यापेक्षा 30 वर्षांनी लहान असलेल्या डॉ. अंका फौरशी लग्न केले आहे. बझ ऑल्ड्रिन यांचे हे चौथे लग्न असल्याचे सांगितले जात आहे.

आपल्या लग्नाची घोषणा करताना ऑल्ड्रिन यांनी लिहिले की, ‘माझ्या 93 व्या वाढदिवसादिवशी, ज्या दिवशी मला ‘लिव्हिंग लीजेंड्स ऑफ एव्हिएशन’कडून सन्मानितही केले जाईल, त्या दिवशी मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, मी माझी दीर्घकालीन गर्लफ्रेंड डॉ. अँका फौरशी लग्नबंधनात अडकलो आहे. आम्ही लॉस एंजेलिसमध्ये एका छोट्याशा खाजगी विवाह सोहळ्यात एकमेकांशी लग्नगाठ बांधली.’

आल्ड्रिन यांनी या पोस्टसोबत आपले टक्सिडोमधील दोन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये आल्ड्रिन यांच्यासोबत त्यांची नववधूही दिसत आहे. या पोस्टनंतर आल्ड्रिन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बझ ऑल्ड्रिन यांनी तीन वेळा लग्न केले आहे आणि घटस्फोट घेतला आहे. अपोलो 11 मिशनच्या तीन सदस्यांच्या क्रूमधील ते एकमेव जिवंत सदस्य आहेत. (हेही वाचा: Viral Video: दुचाकी चालवतांना जोडप्याने केले अश्लील कृत्य, पुढे पोलिसांनी जे केले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ)

जुलै 1969 मध्ये, मिशन कमांडर आर्मस्ट्राँग, लुनर मॉड्यूल पायलट बझ आल्ड्रिन आणि कमांड मॉड्यूल पायलट मायकेल कॉलिन्स यांनी चंद्रावर सुमारे 2.5 दशलक्ष मैलांचा प्रवास करून अपोलो 11 उतरवले होते. त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी चार दिवस लागले होते. नील आर्मस्ट्राँग हे चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती होते. बझ ऑल्ड्रिन त्यांच्यानंतर 19 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले.