Britain's Youngest Mother: 10 वर्षांची मुलगी राहिली गर्भवती, कुटुंबियांना कल्पनाही नाही; ठरली ब्रिटनमधील सर्वात कमी वयाची आई
प्रतीकात्मक फोटो (Photo Credit: Pixabay)

आई (Mother) होण्याची भावना आणि अनुभव जगातील प्रत्येक स्त्रीसाठी खास असतो. मुलाला आपल्या गर्भात 9 महिन्यांपर्यंत सांभाळल्यानंतर त्याला जन्म देताना एक आई आपल्याला होणाऱ्या सर्व वेदना विसरून जाते. मात्र ही भावना अनुभवण्यासाठीही एक ठराविक वेळ असते. निसर्गाने अत्यंत संतुलन साधून प्रत्येक प्रक्रिया निश्चित केली आहे. 18 वर्षांनंतर, मुलीचे शरीर तिच्या शरीरात आणखी एक जीव जगवण्यास सक्षम होते. मात्र ब्रिटनमधून (Britain) समोर आलेल्या एका घटनेने सर्वांना चकित केले. येथे एका 11 वर्षाच्या मुलीने एका मुलीला जन्म दिला आहे. मुलगी 10 वर्षाची असताना ती गरोदर राहिली होती.

रिपोर्टनुसार, ही 11 वर्षांची मुलगी ब्रिटनमधील सर्वात लहान आई म्हणून ओळखली गेली आहे. वयाच्या दहाव्या वर्षी ही मुलगी गरोदर राहिली होती. मुलीने सुरुवातीला पोटात दुखत असल्याची तक्रार केली होती, पोटदुखीमुळे ती बर्‍याचदा रडतही असे. त्यानंतर पालकांनी तिला डॉक्टरकडे नेले. तिथे समजल की, मुलगी 30 आठवड्यांची गरोदर होती. पुढे तिने रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला. सुदैवाने दोघीही ठीक आहेत. इतक्या लहान वयात झालेली गर्भधारणा पासून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत. (हेही वाचा: उंचीमधील फरकामुळे ब्रिटीश जोडप्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद; जाणून घ्या त्यांची हटके Love Story)

या घटनेत मुलीची ओळख लपवून ठेवण्यात आली आहे. याबाबत बोलताना तिच्या पालकांनी सांगितले की, त्यांची मुलगी गरोदर आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती. आता या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मुलीने अद्याप तिच्या पालकांना तिच्यासोबत घडलेल्या कृत्याची माहिती दिली नाही. अशा परिस्थितीत मुलीवर कोणी जबरदस्ती केली व बाळाचा पिता कोण आहे, असा प्रश्न उभा राहतो.

द सनला दिलेल्या मुलाखतीत, डॉ कॅरोल कूपर म्हणाल्या की, सर्वसामान्यपणे 11 व्या वर्षीपासून मुलींची प्युबर्टी सुरू होते. मात्र बर्‍याच प्रकरणांमध्ये ती वयाच्या 8 व्या वर्षी सुरु होते. यापूर्वी ब्रिटनमधील सर्वात लहान वयाची आई होण्याचा विक्रम टेरेसा मिडल्टन (Tressa Middleton) च्या नावे होता. भावाने बलात्कार केल्यानंतर 2006 साली वयाच्या 12 व्या वर्षी तिने एका मुलाला जन्म दिला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर टेरेसाच्या भावाला तुरूंगात टाकले गेले.