![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/09/Add-a-heading-2021-09-21T191818.477-380x214.jpg)
नेहमी आपल्या वक्त्यव्यामुळे चर्चेत राहणारे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो (Jair Bolsonaro) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो सध्या न्यूयॉर्कमध्ये आहेत आणि येथे ते संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या (United Nations General Assembly) च्या 76 व्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आले आहेत. विशेष बाब म्हणजे बोलसोनारो यांनी अद्याप कोविड-19 ची लस घेतली नसून, ते तसेच अमेरिकेत पोहोचले आहेत. आता त्यांना न्यूयॉर्कमध्ये मुक्तपणे संचार करताना पाहिले गेले आहे. महत्वाचे म्हणजे त्यांनी लस न घेतल्याने त्यांना एका रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला गेला आहे.
नुकतेच ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो न्यूयॉर्कच्या रेस्टॉरंटमध्ये पिझ्झाचा आनंद घेताना दिसले आहेत. बोलसोनारोच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांनी बोलसोनारो यांचा सहकारी मंत्र्यांसोबत पदपथावर पिझ्झा खातानाचा फोटो पोस्ट केला. हा फोटो रविवार रात्रीचा आहे. हा फोटो पाहून बोलसोनारोच्या समर्थकांनीही त्यांच्या नेत्याच्या साधेपणाचे कौतुक केले आहे. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, या रेस्टॉरंटने बोलसोनारो यांनी लस घेतली नसल्याने त्यांना आपल्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश देण्यासाठी नकार दिला, म्हणूनच बोलसोनारो यांना फुटपाथवर उभे राहून पिझ्झा खावा लागला.
न्यूयॉर्कच्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे, मात्र कदाचित बोलसोनारो यांना त्याचा विसर पडलेला दिसतो. बोलसोनारो गेल्या वर्षापासून कोविड लसीला विरोध करत आहेत. न्यूयॉर्कला येण्यापूर्वी त्यांनी सांगितले होते की, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी पुरेशी मजबूत आहे. (हेही वाचा: US: नोव्हेंबर पासून अमेरिकेच्या प्रवासासाठी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडून नवे नियम जाहीर)
हे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष गेल्या वर्षी कोरोना संक्रमित झाले होते. ‘अवर वर्ल्ड इन डेटा’ नावाच्या संशोधन गटानुसार, 213 दशलक्ष लोकसंख्येचा ब्राझील, कोरोनाव्हायरस लस देण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र इथल्या राष्ट्रपतींनी लस घेण्यासाठी नकार दिला आहे.