Viral Video: ​तलावात बोटिंग करत असलेल्या लोकांवर अचानक कोसळली दरड; 7 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता, पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
Capitolio Lake (संग्रहित संपादित प्रतिमा)

ब्राझीलच्या (Brazil) मिनास गेराइस (Minas Gerais) राज्यात शनिवारी दरड कोसळून एक मोठी दुर्घटना घडली. कॅपिटोलिओ (Capitolio) तलावामध्ये बोटिंगचा आनंद घेत असणाऱ्या लोकांवर अचानक ही दरड कोसळली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय 20 लोक बेपत्ता आहेत. 'रॉयटर्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

स्थानिक वेळेनुसार शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मिनास गिराईस राज्यात गेल्या 24 तासांपासून पाऊस पडत असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पावसात अशा दरडी कोसळण्याच्या घटना वरचेवर घडत असतात. मिनास गेराइस अग्निशमन विभागाचे कमांडर कर्नल एडगार्ड एस्टेव्हो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हा अपघात सो जोस दा बारा आणि कॅपिटोलियो शहरांदरम्यान झाला. बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू राहणार आहे.

ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सोनारो यांनीही या घटनेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ते म्हणाले की नौदलाने शोध आणि बचाव कार्यात सामील होण्यासाठी मदत पथक तैनात केले आहे. या अपघातात जखमी झालेल्या काही लोकांची हाडे मोडली आहेत. एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्या डोक्याला व चेहऱ्याला दुखापत झाली आहे.  अग्निशमन विभागाचे प्रवक्ते पेड्रो आयहारा यांनी पत्रकारांना सांगितले की, इतर 23 जणांना प्रकृती आता स्थिर आहे. (हेही वाचा: Paragliding करत तरूणाने 8000 फीट उंचीवर गायलं Maa Tujhhe Salaam! पहा Viral Video)

डोंगराळ भागात पावसाचा धोका किंवा खराब हवामानाचा धोका लक्षात घेता पर्यटकांची ये-जा थांबवण्यात येते. परंतु दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा देश असलेल्या ब्राझीलबाबत बोलायचे झाले तर, सरकार सध्या पर्यटनाला चालना देत आहे. गेल्या काही वर्षांत पर्यटन क्षेत्रातून मिळणाऱ्या उत्पन्नाने अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावला आहे. त्यामुळे पावसाळ्यातही काही पर्यटन स्थळे चालू आहेत.