Man Stabs Girlfriend to Death: 'राग आणि भिक माग' ही म्हण आपल्याकडे पूर्वंपार चालत आली आहे. याचीच प्रचिती अमेरिकेतील डेन्ट्रावियास जमाल मॅकनील नामक एका व्यक्तीस आली आहे. या व्यक्तीला यूएस कोर्टाने (US Court) एकदोन नव्हे तर तब्बल 60 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. वय वर्षे 35 असलेल्या या व्यक्तीने 17 ऑगस्ट 2020 रोजी आपल्या 47 वर्षीय महिला जोडीदाराची हत्या केली होती. कॅटी हॉक नावाची ही महिला आरोपीची प्रेयसी होती. आरोपीने एका हॉटेलमध्ये प्रेयसीची हत्या केली.
फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, बेटाऊन पोलिसांना माहिती मिळाली की, त्यांच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेलमध्ये गोंधळ सुरु आहे. पोलिसांनी पुढच्या काहीच क्षणामध्ये घटनास्थळी हजेरी लावली तेव्हा, एक महिला खोलीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या जवळच रक्ताने माखलेला एक चाकूही होता. शिवाय एक तरुण अत्यंत उन्मत्त वर्तन करत होता. पोलिसांनी या तरुणाला अटक केली तर महिलेला रुग्णालयात दाखल केले. जिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला कॅटी हॉक होती. तर अटक केलेला तरुण डेन्ट्रावियास जमाल मॅकनील होता.
पोलिसांनी केलेल्या तपासात कॅटी हॉक हिची हत्या तिच्या प्रियकरानेच केल्याचे निष्पन्न झाले. या खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहणाऱ्या हॅरिस काउंटीचे जिल्हा वकील किम ओग यांनी सांगितले की, चाकुचे घाव वर्मी लागल्यान महिलेच्या हृदयात दोन वार झाले होते. शिवाय तिला 27 वेळा भसकण्यात आले होते. ही महिला दोन लहान मुलांची आई होती. आरोपीच्या कृत्यामुळे त्या मुलांच्या डोक्यावरचे मातृछत्र हरपले.
दरम्यान, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. मात्र, आपण हा हल्ला केवळ स्वसंरक्षणासाठी केल्याचे त्याने सांगितले. त्याने कोर्टामध्ये आपली काहीच चूक नसल्याचे अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला. पण उपलब्ध साक्षी पुराव्यानुसार कोर्टाने आरोपीला 60 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा दिली. गुन्हेगाराचे सध्याचे वय पाहता त्याचे संपूर्ण आयुष्य तुरुंगात जाण्याची शक्यता आहे.