भारतामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक 31 जुलै पर्यंत बंद राहणार: DGCA
Flights| Photo Credits: ANI

भारतामध्ये वाढता कोरोनाचा धोका पाहता आता आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा (International Commercial Passenger Flights) 31 जुलै पर्यंत बंदच राहणार आहे अशी माहिती आज (3 जुलै) DGCA कडून देण्यात आली आहे. भारतामध्ये 1 जुलै पासून लॉकडाऊनचा सहावा टप्पा सुरू झाला आहे. यामध्ये काही गोष्टींवरील निर्बंध उठवण्यात आले आहेत. मात्र अनलॉक जसे सुरू झाले तसे लोकांमध्ये बेशिस्तपणा वाढला आहे. परिणामी काही ठिकाणी पुन्हा कोरोना बाधितांच्या आकड्यांमध्ये वाढ झाली आहे. आज देशात 20 हजारांपेक्षा अधिक रूग्ण समोर आले आहेत.

परदेशामध्ये अडकलेल्या भारतीयांना, पर्यटकांसाठी मात्र सध्या वंदे भारत ही विशेष मोहीम 6  मे पासून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार जगभरातून भारतीयांची परदेशातून सुटका केली जात आहे. दरम्यान देशामध्ये डोमेस्टिक फ्लाईट्सना परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार पुरेशी खबरदारी घेत आता देशांर्गत प्रवास करता येऊ शकतो. सोबतच आज वाढवण्यात आलेल्या निर्बंधामध्ये कार्गो, मालवाहतूक विमानांना मुभा असेल अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र परदेशामध्ये अडकलेल्या अनेक नागरिकांनी आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक सुरू करण्याची विनंती केली आहे.

ANI Tweet

भारतामध्ये आज मागील 24 तासांत सर्वाधिक 20,903 नवे रूग्ण तर 379 मृत्यूची नोंद झाली आहे. देशात 6,25,544 वर रूग्ण संख्या पोहचली आहे. त्यापैकी 2,27,439 जणांवर उपचार सुरू आहेत. 3,79,892 जण या आजारातून बाहेर पडले आहेत तर 18213 जणांचा मृत्यू झाला आहे.