फेसबूक (Facebook) ने काल (17 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) बातम्यांची सेवा बंद करत असल्याची घोषणा केली आहे. यामुळे आता ऑस्ट्रेलियामध्ये युजर्सना फेसबूक अॅपच्या माध्यमातून न्यूज फीड वर बातम्या पाहता येणार नाहीत. दरम्यान त्याचा फटका काही इमरजन्सी अलर्ट देणार्या ऑस्ट्रेलियन पेजेसलाही बसला आहे. त्यामध्ये कोविड 19 अपडेट्स, बुश फायर अर्थात वणवा किंवा सायक्लोनचे अपडेट्सही युजर्सना मिळणार नाहीत. सध्या आरोग्य, हवामान खात्याशी निगडीत काही पेजेस ब्लॅंक दाखवली जात आहेत.
ऑस्ट्रेलिया मध्ये फेसबूक आणि गूगल कडून बातम्यांसाठी पैसे आकारण्याचा नवा कायदा लागू करण्याचा तेथील सरकारचा विचार आहे. हा कायदा पारित झाल्यास फेसबूक आणि गुगलला बातम्या दाखवण्यासाठी माध्यम कंपन्यांना पैसे द्यावे लागणार आहेत. सध्या याच मीडिया लॉ वरून फेसबूक आणि ऑस्ट्रेलिया सरकार मध्ये संघर्ष सुरू आहे. यामध्ये आता फेसबूकने युजर्सच्या न्यूज फीड वर बातम्या दाखवणं बंद केलं आहे. हा प्रभाव ऑस्ट्रेलियामधील युजर्ससाठीनाही तर ऑस्ट्रेलिया बाहेर असणार्यांनाही ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही बातम्या वाचता येणार नाहीत. त्यामुळे आता आपत्कालीन अलर्ट बाबत सजग राहण्यासाठी संबंधित वेबसाईटला भेट देण्याचं किंवा ट्वीटर वर अलर्ट पाहण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये काही मंत्र्यांनी मागील आठवड्यात फेसबूकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि अल्फाबेट इंक यांच्या सोबत गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यापूर्वी देखील ऑस्ट्रेलियामधील मीडिया कंपन्यांना पैसे देण्याच्या विवादित कायद्यावरून गूगल ने ऑस्ट्रेलिया मध्ये आपलं सर्च इंजिन बंद करण्याची धमकी दिली होती.