ऑस्ट्रेलियात मुसळधार पावसाची हजेरी, मगरींची रस्त्यावर एन्ट्री
Australia Heavy Rain (Photo Credits-Twitter)

कॅनबेरा: उत्तर-पश्चिम ऑस्ट्रेलिया (Australia) येथे मुसळधार पावासामुळे तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर क्विसलँडच्या प्रिमीअर यांनी 100 वर्षातील पहिली घटना असल्याचा दावा केला आहे. तर 14.5 सेमी पावसामुळे धरणातील पाणी रस्त्यारस्त्यांवर दिसून येत आहे. तसेच अनेक नागरिकांचा घरात हे पाणी शिरल्याने त्यांना घर सोडून जावे लागले असल्याची परिस्थिती तेथे निर्माण झाली आहे.

रॉस रिव्हर डॅम मधून प्रति सेकंद 1900 क्युबिक मीटर पाणी बाहेर येत आहे. तर अधिकाऱ्यांकडून तेथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन 20 हजार घरे धोक्यात असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे तलावातील मगरी या रस्त्यारस्त्यावर उतरल्या आहेत. क्विसलँड येथील रस्त्यावर भरपूर प्रमाणात पाणी भरले असून वीज पुरवठा खंडित झाला आहे. तर काही नागरिकांना त्यांच्या घराच्या छतावर राहण्याची परिस्थिती ओढावली आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोकांशी संपर्क तुटण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता एनास्तसिया पालास्जुक यांनी सांगितले आहे. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन नागरिकांना देण्यात आले आहे.तेथील मिलिट्री घटनास्थळी पोहचली असून या परिस्थित अडकेल्या नागरिकांची मदत करत आहेत.