गोळीबार प्रकरणी श्रीलंकेचे पेट्रोलियम मंत्री अर्जुन रणतुंगा यांना अटक
अर्जुन रणतुंगा (Photo credit: Twitter)

श्रीलंकेतील राजकीय वातावरण आता चांगलेच तापलेले दिसत आहे. रानिल विक्रमसिंघे यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यात आल्यानंतर, विक्रमसिंघे यांचे विश्वासू समर्थक आणि पेट्रोलियम मंत्री अर्जुन रणतुंगा यांना अटक करण्यात आली आहे.

माजी पेट्रोलियम मंत्री अर्जुन रणतुंगा आपल्या कार्यालयाकडे जात असताना त्यांची गाडी आंदोलकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या सुरक्षा रक्षकाने आंदोलकांवर गोळीबार केला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, कोलंबो क्राइम विभागाने सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबार प्रकरणी माजी पेट्रोलियम मंत्री अर्जुन रणतुंगा यांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे, असे पोलीस प्रवक्ते रुवान गुनासेखरा यांनी सांगितले.

रणतुंगा हे विक्रमसिंघे यांचे समर्थक आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाल सिरीसेना यांनी शुक्रवारी रात्री विक्रमसिंघे यांना पंतप्रधानपदावरून हटवून त्यांच्या जागी महिंदा राजपक्षे यांची नियुक्ती केली. त्यामुळे श्रीलंकेत सत्तासंघर्ष पेटला आहे. त्यातूनच आजचा गोळीबाराचा प्रकार घडला.