खात्मा केल्यावर ISIS म्होरक्या बगदादी याच्या मृतदेहाचे अमेरिकेने काय केले?
Abu Bakr al-Baghdadi | (Photo Credit: Archived, edited, representative images)

अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसमा बीन लादेन, इराकचा हुकुमशाहा सद्दाम हुसैन आदींच्या मृतदेहाचे अमेरिकेने काय केले? हा प्रश्न जगभरातील अनेकांसाठी प्रदीर्घ काळ उत्सुकता वाढवणारा होता. आयसीस (ISIS) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबु बक्र अल-बगदादी (Abu Bakr al-Baghdadi) याचाही खात्मा अमेरिकेने नुकताच केला. अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तसे जाहीरही केले. त्यानंतर बगदादी याच्या मृतदेहाचे अमेरिका काय करणार? याबाबत उत्सुकता वर्तवली जात होती. ही उत्सुकता फार न ताणता अमेरिकी ज्वाइंट चीफ्स स्टाफ प्रमुख मार्क मिले यांनी ही माहिती दिली.

अमेरिकी ज्वाइंट चीफ्स स्टाफ प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकी मोहीम कार्यवाही मानक आणि सशस्त्र संघर्ष कायदा अन्वये बगदातीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बगदादी याच्या मृत्यूची खबर देताना ट्रम्प यांनी म्हटले होते की, अमेरिकी लष्कराच्या जवानांनी बगदादी लपला असलेल्या ठिकाणाला घेरले. लष्कराच्या श्वान पथकानेही बगदादीचा जोरदार पाटलाग केला. शेवटी बगदादी याच्याकडे बचावासाठी कोणताच मार्ग उरला नव्हता. हे जेव्हा त्याच्या ध्यानात आले तेव्हा त्याने स्फोटकांनी भरलेले जॅकेट परिधान करुन स्वत:ला उडवून दिले. या आत्महघातकी हल्ल्यात तो मारला गेला. (हेही वाचा, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी लष्कराच्या कुत्र्याचे केले कौतुक; ISIS म्होरक्या बगदादी याचा खात्मा केल्याबद्दल म्हणाले 'ग्रेट जॉब')

अमेरिकी ज्वाइंट चीफ्स स्टाफ प्रमुख मार्क मिले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, 'बगदादी याचा मृतदेह न्यायवैद्यकीय चाचणीसाठी (फॉरेन्सीक डीएनए टेस्ट) एका सुरक्षीत केंद्रात नेण्यात आले होते. जेणेकरुन त्याची ओळख पटवता यावी आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करता यावेत. ही प्रक्रीया पूर्ण झाली असून, त्याच्यावर योग्य प्रकारे अंत्यसंस्कार करण्यात आले. अमेरिकी मोहीम कार्यवाही मानक आणि सशस्त्र संघर्ष कायदा अन्वये बगदातीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले' , असेही मार्क मिले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, अल कायदा ओसमा बिन लादेन याचा मृतदेह समुद्रात दफन करण्यात आला होता. 2011 मध्ये पाकिस्तानमधील एबटाबाद येथील अमेरिकी कारवाईत लादेन मारला गेला होता. बगदादीबद्दल बोलताना मिले यांनी पुढे सांगितले की, अमेरिकी लष्कराने केलेल्या करवाईत ज्या ठिकणी बगदादी याचा मृतदेह सापडला तिथे आयसीस आणि संघटनेच्या भविष्यासंबंधीत योजनांबाबतची काही सामग्रिही आढळून आली. मात्र, मी त्याबाबत पूर्ण तपास झाल्याशिवाय माहिती देणार नाही. बगदादी याच्यासोबत असलेल्या दोन व्यक्तींनाही येथे पकडण्यात आले.