अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी तालिबानने देशावर ताबा मिळवल्यानंतर अबू धाबी मध्ये दाखल, UAE सरकारची माहिती
Afghan President Ashraf Ghani. (Photo Credits: ANI/File)

अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबुलवर तालिबान्यांनी (Taliban) आपला ताबा मिळवला आहे. त्यापूर्वी देशाचे राष्ट्रपती अशरफ गनी (Ashraf Ghani) यांनी देश सोडून पळ काढला. गनी हे नेमके गेले कुठे यावरुन जोरदार चर्चा सुद्धा सुरु झाली होती. आता यावरच पूर्णविराम लागला आहे. अफगाणिस्तानातून गनी यांनी पळ काढल्यानंतर आता ते UAE मध्ये आहेत. युएईने या गोष्टीची पुष्टी केली आहे. युएई कडून असे म्हटले आहे की, मानवतेच्या आधारावर अशरफ गनी आणि त्यांच्या परिवाराला स्थान दिले आहे.

याच दरम्यान ताजिकिस्तान स्थित अफगाणिस्तान दूतवासाने इंटरपोलने अशरफ गनी यांना ताब्यात घ्यावे असे म्हटले आहे. एंबेसीने इंटरपोलला अशरफ गनी, हमदल्लाह मोहिब आणि फजल महमूद फाजली यांना सार्वजनिक संपत्ती चोरल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे अफगाणिस्तान मधील फंड पुन्हा त्यांना मिळेल. टोलो न्यूज यांच्या सुत्रांनी दिलेल्या अहवालानुसार अशी बातमी चालवली जात आहे की, अशरफ गनी यांच्यावर संपत्ती चोरी केल्याचा आरोप लावला आहे. यासंदर्भातच अफगाण दूतवासाने इंटरपोलने अटक करावी अशी मागणी केली आहे.(Afghanistan-Taliban Conflict News: अफगाणिस्थानात तालिबानांच्या दहशतीला सुरुवात, आंदोलनकर्त्यांवर केला गोळीबार, यात 2 ठार तर 12 जण जखमी)

दुसऱ्या बाजूला उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी स्वत:ला देशाला काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून घोषित केले आहे. अमरुल्ला सालेह यांनी मंगळवारी ट्विट करत असे म्हटले की, आता ते अफगाणिस्तानच्या संविधनानुसार काळजीवाहू राष्ट्रपती आहेत. सालेह यांच्या या घोषणेनंतर ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे मध्ये असलेल्या अफगाणी दूतवासने अशरफ गनी यांचे फोटो काढून टाकले आहेत. गनी यांच्या जागेवर आता अमरुल्ला सालेह यांचे फोटो लावले आहेत.

तर अफरफ गनी यांनी 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान सोडून पळ काढला होता. त्यानंतर काही वेळाने तालिबानने राजधानी काबुल आणि राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला. अफगाणिस्तान सोडल्यानंतर गनी यांनी असे म्हटले की, देशात रक्तपात आणि घातपात थांबवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. अफगाणिस्तानातून पळ काढल्यानंतर मीडियात अशा प्रकारचे रिपोर्ट्स आले होते की, अशरफ गनी यांनी गाड्यांमधून पैसे भरत पळ काढला आहे.