28 तासांमध्ये उभी केली 10 मजली इमारत

चीन (China) आपल्या तंत्रज्ञानाने नेहमीच जगाला आश्चर्यचकित करत असतो. आता त्याने पुन्हा असा एक पराक्रम केला असून, सोशल मिडियावर सध्या त्याचीच चर्चा सुरु आहे. चीनने 28 तासांच्या आत 10 मजली इमारत (10-Storey Building) उभी केली आहे. होय, विश्वास बसत नाही ना? मात्र हे सत्य आहे. जिथे घराचा पाया भरण्यास एक आठवडा लागतो तिथे चीनने एका दिवसात 10 मजल्यांची इमारत उभी केल्याने देशाचे कौतुकही होत आहे. चीनच्या चांगशा सिटीमधील (Changsha City) कंपनी ब्रॉड ग्रुपने (Broad Group) हे आश्चर्यकारक काम केले आहे. या कंपनीने इमारत उभारणीचा व्हिडिओ YouTube वर अपलोड केला आहे.

या कंपनीने ही इमारत उभी करण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, त्याला प्रीफेब्रिकेटेड कन्स्ट्रक्शन सिस्टम म्हणतात. यामध्ये इमारतीचे निर्माण मॉड्यूलर युनिट्स एकत्र करून केले जाते, जे आधीच एका कारखान्यात तयार केलेले असतात. एखाद्या कंटेनरसारखे हे प्रीफेब्रिकेटेड युनिट्स बांधकाम साइटवर नेले जातात आणि नंतर तिथे एकत्र जोडले जातात. हे युनिट्स एकत्र जोडण्यासाठी सर्व खोबण्या आधीपासूनच बनवलेल्या असतात. इमारत साईटवर हे युनिट्स एकत्र करून, खोबण्यांमध्ये जोडून बोल्ट्स टाईट केले जातात. अशा प्रकारे एकावर एक युनिट्स उभा करून ही 10 माजली इमारत बांधली गेली आहे. कंपनीने ही पूर्ण प्रक्रिया एका व्हिडीओमार्फत शेअर केली आहे.

महत्वाचे म्हणजे ही इमारत इंस्टॉल आणि डिसमेंटल तत्वावर उभी केली आहे, ज्यामुळे या घरांना कुठेही शिफ्ट केले जाऊ शकते. फक्त घरेच नाही तर संपूर्ण सोसायटी कुठेही शिफ्ट केली जाऊ शकते. कंपनीने सांगितले की, अशी घरे उभी करणे सोपे आहे. यामध्ये नट-बोल्ट टाईट करून, लोकांना वीज व पाण्याचे कनेक्शन दिले की झाले. लोक इथे आरामात राहू शकतात. अजून एक गोष्ट म्हणजे ही घरे आणि त्याचे इंटिरियर डिझायनिंगही खूपच आकर्षित आहे. (हेही वाचा: चक्क नर उंदरांना Pregnant करून त्यांना पिल्लांना जन्म देण्यास भाग पाडले; China च्या शास्त्रज्ञांचा विचित्र प्रयोग)

भूकंप, वादळ, पाऊस यांसारख्या नैसर्गिक आपत्ती चीनमध्ये सतत येत असतात, त्यामुळे अशी घरे हलविणे सोपे होईल. ही घरे भूकंप प्रतिरोधक आणि बरीच मजबूत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या घरांमध्ये स्टीलचा वापर केला आहे. ही घरे बांधकाम आणि इमारतीच्या जगातील क्रांतीसारखी आहेत असे लोकांचे म्हणणे आहे.