स्पेन झेंडा (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतापेक्षा जवळजवळ 6 पटीने आकाराने लहान असलेला देश स्पेन (Spain), या ठिकाणी कोरोना व्हायरसने (Coronavirus) फारच हाहाकार माजवला आहे. देशातील एकूण संक्रमितांची संख्या 284,986 असून, तब्बल 27,119 लोक मरण पावले आहेत. या मरण पावलेल्या लोकांच्या आठवणीसाठी स्पेनमध्ये 5 जूनपर्यंत राष्ट्रीय दुखवटा (Mourning Period) जाहीर केला आहे. दहा दिवस चालणारा हा दुखवटा काल सुरु झाला. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सान्चेझ (Pedro Sánchez) यांनी कोविड-19 साथीच्या पीडितांसाठी 10 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला. वृत्तसंस्था सिन्हुआच्या वृत्तानुसार, शनिवारी टीव्हीवर त्यांनी ही घोषणा केली.

महत्वाचे म्हणजे स्पेनच्या लोकशाहीच्या इतिहासातील हा सर्वात प्रदीर्घ काळाचा दुखवटा असणार आहे. या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये सर्व सार्वजनिक इमारती, सर्व नौसेना जहाजांवर झेंडे अर्ध्यापर्यंत खाली घेतले जातील. जेव्हा लॉक डाऊन संपेल तेव्हा राज्यप्रमुख पीडितांना श्रद्धांजली अर्पण करतील. सध्या सान्चेझ यांनी लॉक डाऊनबाबत काही निर्बंध शिथिल केले आहेत. हे सांगताना ते म्हणाले की, ‘सोमवारपासून एकाच प्रांतात राहणारे लोक त्यांच्या कुटुंबियांना किंवा मित्रांना भेटू शकणार आहेत. दुकाने पुन्हा सुरु होतील आणि रस्ते वाहतूकही सुरु होईल.’

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दुखावट्याला मंजुरी देण्यात आली. यात स्पेनचे राज्यप्रमुख किंग फिलिप सहावा यांच्या अध्यक्षतेखाली एक स्मारकविधी सोहळ्याचा समावेश असेल, असे सरकारी प्रवक्त्या मारिया जीसस मॉन्टेरो यांनी सांगितले. सध्या संक्रमणाच्या बाबतील आणि मृत्युच्याही बाबतीत स्पेन अमेरिका, ब्राझील, रशियानंतर चौथ्या स्थानावर आहे. (हेही वाचा: जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 5.7 मिलियन तर बळींचा आकडा 355,000 च्या पार)

दरम्यान, नुकतेच स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सान्चेझ  यांनी जाहीर केले आहे की, 1 जुलैपासून स्पेनमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे स्वागत असणार आहे. एका सरकारी अहवालानुसार, स्पॅनिश सरकार पर्यटनाला चालना देण्यासाठी 14 दिवसांच्या विलगीकरणाच्या नियमालादेखील बाजूला करणार आहे. यामुळे स्पेनमध्ये येणार्‍या आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी सर्व दरवाजे पूर्णपणे उघडतील.