YouTube Music Layoffs: चांगल्या वेतनाची मागणी करणे पडले महागात; कंपनीने युट्यूब म्युझिकच्या अनेक कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता
YouTube Music (Photo Credits: Wikimedia Commons)

गेल्या काही महिन्यांमध्ये जगभरातील अनेक मोठ-मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. आता यूट्यूबमध्ये (YouTube) टाळेबंदीचा टप्पा सुरू झाला आहे. अलीकडेच YouTube Music च्या टीमला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. संघात एकूण 43 जण होते. पगार आणि भत्ता वाढ अशी या संघाची मागणी होती. मात्र त्यांच्या मागणीवर चर्चा करण्याऐवजी कंपनीने संपूर्ण टीमलाच काढून टाकले. यानंतर गदारोळ सुरू झाला आहे. या सर्वांना कॉग्निझंटने गुगलसाठी नियुक्त केले होते. आता कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यावर, गुगलने म्हटले आहे की या प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नाही आणि कॉग्निझंटने हे सर्व केले आहे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, यूट्यूब डेटा विश्लेषक जेक बेनेडिक्ट अमेरिकेच्या ऑस्टिन सिटी कौन्सिलला गुगलसोबत त्यांच्या युनियन वाटाघाटी पुढे नेण्याचे आवाहन करताना दिसत आहे, मात्र त्याचवेळी, जॅक बेनेडिक्टला निराशाजनक बातमी मिळाली की गुगलने त्याला आणि इतर 43 लोकांना कोणतीही सूचना न देता तात्काळ नोकरीवरून काढून टाकले आहे.

गुगल आणि कॉग्निझंट या दोघांनी युट्यूब म्युझिकसाठी करारावर नियुक्त केलेले कर्मचारी काही महिन्यांपूर्वी एकत्र आले होते आणि त्यांनी चांगला पगार, भत्ते आणि काही नियमांमध्ये शिथिलता यांची मागणी केली होती. मात्र गुगलने कर्मचाऱ्यांशी कोणत्याही प्रकारच्या संभाषणाला स्पष्ट नकार दिला होता. गुगलने सांगितले की ते कंपनीचे कर्मचारी नाहीत, त्यामुळे त्यांच्याशी बोलता येणार नाही. त्यानंतर आता नॅशनल लेबर रिलेशन्स बोर्डने गुगलच्या युट्यूब म्युझिक कामगारांशी वाटाघाटी करण्यास नकार देण्याच्या निर्णयास बेकायदेशीर ठरवले. कंपनीसोबत पगाराबाबतच्या चर्चेसाठी हे कर्मचारी प्रयत्न करत असतानाच, त्यांना कामावरून काढून टाकले. (हेही वाचा: Sony Layoffs: सोनी ग्रुप 900 लोकांना कामावरून काढून टाकणार, Playstation विभागामध्ये होणार टाळेबंदी, लंडन स्टुडिओही बंद होण्याची शक्यता)

या काढून टाकलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, अचानक नोकरी गेल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. काही कर्मचाऱ्यांना पैशांअभावी भाडे भरता येणार नाही. त्यामुळे ते बेघर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. द व्हर्जने दिलेल्या वृत्तानुसार, हे प्रकरण वाढू लागल्यावर कॉग्निझंटने म्हटले आहे की, या कर्मचाऱ्यांना काढून टाकले नाही तर, त्त्यांचे करार 'नैसर्गिकपणे' संपुष्टात आले आहेत. आता ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे त्यांना कंपनीत इतर रोल्स शोधण्यासाठी सात आठवड्यांची सशुल्क सुट्टी दिली जाईल.