युट्युब म्युझिक (Photo credits: Pixabay)

गेल्या काही वर्षांत यूट्यूब (YouTube) भारतात खूप लोकप्रिय झाले आहे. मागील पाच वर्षात देशभरातील यूट्यूब वापरकर्त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या भारतात यूट्यूबवर 46 कोटींहून अधिक लोक सक्रिय आहेत. यामुळेच यूट्यूब दरवर्षी लाखो नोकऱ्याही निर्माण करत आहे. आता या सोशल मीडिया कंपनीने सांगितले आहे की, भारतीय यूट्यूब निर्माते भारताच्या जीडीपीमध्ये 6800 कोटी रुपयांचे योगदान देतात.

जसजसे यूट्यूब चॅनेल वाढत आहेत, तसतसे नोकऱ्याही वाढत आहेत. यूट्यूबवरून देशात दरवर्षी 7 लाख नोकऱ्या निर्माण होत आहेत. यूट्यूबचे मुख्य उत्पादन अधिकारी आणि गुगल (Google) चे एसव्हिपी (SVP) नील मोहन यांनी CyFy 2022 मध्ये व्हर्चुअल सहभाग नोंदवला. या ठिकाणी नील मोहन म्हणाले, 'यूट्यूब क्रिएटरची अर्थव्यवस्था भारतात वेगाने वाढत आहे. दरवर्षी 6800 कोटी रुपयांचे योगदान दिले जात आहे आणि 7 लाख नोकऱ्या निर्माण होत आहेत.’

CyFy 2022 ही तंत्रज्ञान, इनोव्हेशन आणि सोसायटी या विषयावरील परिषद आहे. ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन (ORF) तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नील मोहन पुढे म्हणाले की, यूट्यूब केवळ क्रिएटरना त्यांचे प्रेक्षक वाढवण्याची संधी देत ​​नाही, तर त्यांना त्यांचा व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक संधी देखील उपलब्ध करून देते. यूट्यूब हे एक असे व्यासपीठ आहे, जिथे सर्व प्रकारच्या व्यवसायांची भरभराट होत आहे. कारण हे व्यासपीठ जाहिरातींवर चालणारे माध्यम व्यासपीठ आहे. (हेही वाचा: Google Chrome Update: लवकरच 'या' लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर गुगल क्रोम बंद होण्याची शक्यता; जाणून घ्या सविस्तर)

ते म्हणाले, सर्जनशील यश तसेच लैंगिक वैविध्यतेच्या दृष्टीने सर्व प्रमुख भारतीय भाषा आमच्या प्लॅटफॉर्मवर प्रतिनिधित्व करतात. मोहन पुढे म्हणाले की, यूट्यूब हे एक असे ठिकाण आहे जिथे संपूर्ण भारतातील कंटेंट क्रिएटर आघाडीवर आहेत. यूट्यूब सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण बनवणे हे आमचे प्राधान्य आहे.