Xiaomi चा फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात धडकणार; मोबाईलमध्ये असणार 5 पॉप-अप कॅमेरे
Xiaomi (photo Credit: IANS/Representative Image)

सध्या भारतीय बाजारात फोल्डेबल स्मार्टफोनची चलती आहे. आकर्षक दिसणा-या या स्मार्टफोनकडे सध्या अनेक भारतीयांचा कल पाहायला मिळतो आहे. भारतीय बाजारात आधीच सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड (Samsung Galaxy Fold) आणि हुआवे मेट एक्स (Huawei Mate X) दाखल झाले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत तग धरुन राहण्यासाठी आता शाओमीही लवकरच आपला फोल्डेबल स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. मटाने दिलेल्या वृत्तानुसार, शाओमीने नुकताच प्रोटोटाइप फोल्डेबल फोनचा एक व्हिडिओ जारी केला आहे. या फोनशी संबंधित काही माहितीही समोर आली आहे.

शाओमीने (Xiaomi) चीनमध्ये नुकताच पाच रिअर कॅमेऱ्यांचा Mi CC9 Pro हा फोन लाँच केला. शाओमी आता पेंटा (पाच कॅमेरे) टेक्निकचा वापर फोल्डेबल फोनमध्येही करणार आहे. काही वृत्तांनुसार, शाओमीने फोल्डेबल फोनमध्ये पॉप अप कॅमेरा सेटअप दिला आहे. हा फोन कधी लाँच होईल याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, मात्र येत्या काही महिन्यात हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- भारतात शाओमी कंपनीचा 108 मेगापिक्सलचा धमाकेदार cc9 प्रो स्मार्टफोन लॉन्च, पाहा फिचर्स आणि किंमत

Tigermobiles या वेबसाइटने शाओमीच्या फोल्डेबल फोनचा डिझाइन पेटंट फोटोही जारी केला आहे. यामध्ये पाच पॉप अप कॅमेरा सेन्सर्स दिसून येत आहेत. हा कॅमेरा सेटअप फ्रंट आणि रिअर या दोन्हीसाठी काम करणार असल्याचंही यामधून दिसत आहे.

फोन अनफोल्ड केल्यास पॉप अप कॅमेरा फोनच्या डाव्या बाजूला दिसतो. काही वृत्तांनुसार, शाओमीचा हा नवा फोन 74,000 रुपये किंमतीच्या आसपास लाँच केला जाऊ शकतो. Samsung Galaxy Fold ची किंमत जवळपास 40,000 आहे, तर Huawei Mate X ची किंमत 1,85,290 रुपये आहे.