जिओला टक्कर, ग्राहकांचा फायदा; वोडफोनकडून ४ महिने इंटरनेट 'फ्री'
वोडाफोन

टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने अल्पावधीत घेतलेली झेप. आगोदरच या क्षेत्रात असलेल्या नामचीन कंपन्यांना बसलेला फटका. अलिकडे तर या कंपन्यांच्या अस्तित्वावरच आलेला घाला विचारात घेता, रिलायन्स जिओचा वारु रोखण्यासाठी तिच्या स्पर्धक कंपन्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे रिलायन्सच्या स्पर्धक कंपन्यांनीही ग्राहकांवर विविध ऑफर्सची बरसात सुरु केली आहे. रिलायन्स जिओची एक स्पर्धक कंपनी वोडाफोननेही ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार व्होडाफोनकडून ग्राहकांना चक्क ४ महिने इंटरनेट पूर्णपणे फ्री मिळणार आहे. काय आहे ऑफर घ्या जाणून...

Vodafoneने आपल्या ब्रॉडबँड ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर आणली असून, कंपनीने YOU ब्रॉडबँड सेवा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ४ महिने इंटरनेट फ्री देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, जे ग्राहक ब्रॉडबँड प्लानसाठी १२ महिन्यांचे सबस्क्रिप्शन घेतील त्यांना ४ महिने इंटरनेट फ्री योजनेचा फायदा घेता येईल. म्हणजेच ही सेवा घेणाऱ्या ग्राहकाला १२ महिन्यांच्या सेवेसाठी पैसे भरल्यावर १६ महिने अनलिमिटेड इंटरनेट वापरण्याची संधी मिळेल.

कंपनीचे ४ महिन्यांचे अतिरिक्त सबस्क्रिप्शन १२ महिन्यांमध्ये विभागले आहे. म्हणजेच, जर तुम्ही तुमचा प्लान ६ महिन्यांसाठी वाढवत असाल तर, त्यावर तुम्हाला २ महिन्यांचे सबस्क्रिप्शन मोफत मिळेल. जर ९ महिन्यांची अतिरिक्त व्हॅलिडिटी घ्याल तर, ग्राहकाला ३ महिन्यांसाठी फ्री सबस्क्रिप्शन मिळेल. पण, या सेवेचा फायदा घ्यायचा असेल तर, ग्राहकाला वोडाफोनच्या वेबसाईटवर जाऊनच रिचार्ज करावे लागेल. त्यासाठी UPGRADE33 हा प्रोमोकोड वापरणे गरजेचे आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला ३० सप्टेंबरपूर्वी रिचार्ज करावे लागणार आहे.

दरम्यान, १५ऑगस्टपासून जिओने गीगाफायबरसाठी रजिस्ट्रेशन सुरु केले होते. त्यानंतर काही दिवसांतच बातमी आली की, कंपनी लवकरच सुमारे ९०० मोठ्या शहरांमध्ये आपली सेवा सुरु करणार आहे. जिओ ग्राहकांना केवळ ५०० रुपयांमध्ये ही सेवा देईल. तसेच, तीन महिन्यांसाठी ३०० जीबी डेटाही फ्री देईल, असेही वृत्त होते. दरम्यान, रिलायन्सचा वारु रोखण्यासाठी स्पर्धक कंपन्या विविध योजना घेऊन बाजारात येत आहेत. या बड्या कंपन्यांमुळे ग्राहकांची मात्र चंगळ होते आहे.