Truth Social: माजी राष्ट्रपती Donald Trump यांनी लॉन्च केला स्वतःचा सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’
Donald Trump | (Photo Credits: Facebook)

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अखेर त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे. ट्रम्प यांचे ‘ट्रुथ सोशल’ (Truth Social) हे अॅप सध्या अॅपलच्या अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना गेल्या वर्षी अनेक सोशल प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली होती, त्यानंतर त्यांनी स्वतःचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणण्याची घोषणा केली होती. 'द डेली स्टार'च्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्यावर 6 जानेवारी 2021 रोजी ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबवर बंदी घालण्यात आली होती.

ट्विटरवर बंदी घालण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचे 89 दशलक्ष फॉलोअर्स होते. ट्रम्प यांच्या समर्थकांनी यूएस कॅपिटलवर हल्ला आणि निषेध केल्यानंतर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. ट्रम्प यांच्यावर हिंसा भडकावणारे संदेश पोस्ट केल्याचा आरोप होता.

ट्रुथ सोशल अॅपच्या मते, 'हे असेच एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जे कोणत्याही प्रकारच्या राजकीय भेदभावापासून मुक्त आहे.' सध्या ट्रुथ सोशल फक्त US App Store वर उपलब्ध आहे व ते इतर कोणत्याही देशात डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध नाही. हे अॅप अद्याप गुगल प्ले स्टोअरवर लॉन्च करण्यात आलेले नाही. ट्रम्प यांचे ट्रुथ सोशल अॅप ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुपने विकसित केले आहे. अमेरिकेचे माजी प्रतिनिधी डेविन न्युन्स हे ट्रम्प यांची मीडिया कंपनी हाताळत आहेत. (हेही वाचा: Rail Ticket: रेल्वेने लॉन्च केले Confirmtkt App; चुटकीसरशी कन्फर्म होणार तुमचे तिकीट, जाणून घ्या सविस्तर)

यापूर्वी, डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियरने ट्रुथ सोशल मीडियावर पहिली पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्याने एक स्क्रीनशॉट पोस्ट शेअर केला आहे, जो त्याचे वडील @realDonaldTrump यांच्या व्हेरिफाईड खात्याचा आहे.

दरम्यान, यूएस नॅशनल आर्काइव्हज ऑफ रेकॉर्ड अॅडमिनिस्ट्रेशन (NARA) ने ट्रम्प यांच्यावर व्हाईट हाऊसची अनेक कागदपत्रे फ्लोरिडामध्ये नेल्याचा आरोप केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे राष्ट्रीय अभिलेखागाराने हा आरोप केला आहे. आता या प्रकरणी अमेरिकेच्या न्याय विभागाशी संपर्क साधण्यात आला आहे. द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, नॅशनल आर्काइव्हजने म्हटले आहे की, अध्यक्षीय निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडले तेव्हा त्यांनी कागदपत्रांचे 15 बॉक्स सोबत नेले होते.