Tesla Cybercab Robotaxi, Tesla Robovan (Photo Credits: X/@Tesla)

टेस्लाने (Tesla) अखेर आपल्या बहुप्रतिक्षित स्वतः चालणाऱ्या रोबोटॅक्सीचे (Self-Driving Robotaxi) अनावरण केले आहे. कंपनीने सायबरकॅब (Cybercab) आणि रोबोव्हॅन नावाची दोन पूर्णपणे ड्रायव्हरलेस मॉडेल सादर केली आहेत. गुरुवारी लॉस एंजेलिस, कॅलिफोर्नियाजवळ एका खाजगी कार्यक्रमात रोबोटॅक्सीस सादर करण्यात आले. 2026 मध्ये त्यांचे उत्पादन सुरू होईल असे सांगण्यात येत आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांचे ध्येय चालकविरहित भविष्यासाठी, स्वायत्त टेस्ला कॅबचा ताफा चालवण्याचे आहे. या गाड्या लोक राइडशेअरिंग ॲपद्वारे बुक आणि कॉल करण्यास सक्षम असतील.

ही नवीन युगातील वाहने वाहतूक, पादचारी आणि भौतिक धोक्यांसह त्यांच्या सभोवतालची परिस्थिती जाणून घेतात आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय त्यांच्यावर नियंत्रण ठेऊन मार्ग आणि वेग साधतात. सायबरकॅबला कूप सारख्या स्टाइलसह दोन-दरवाजा हॅचबॅकचा लूक देण्यात आला आहे. सायबरकॅबची किंमत $30,000 (सुमारे 25.19 लाख) पेक्षा कमी असेल. (हेही वाचा; BYD eMax 7 MPV to Launch Tomorrow in India: बुकींग सुरु; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स)

यामध्ये स्टीयरिंग व्हील किंवा पेडल्स नाहीत. म्हणजेच या कारमध्ये बसून तुम्ही ड्रायव्हरलेस अनुभव देऊ शकता. आतील भागात दोन जागा आहेत, एक आर्मरेस्ट आणि कपहोल्डर आहे. प्रवाशांना गुंतवून ठेवण्यासाठी एक मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीनही आहे. मस्कने म्हटले आहे की, सायबर कॅबला ऑपरेट करण्यासाठी 20 सेंट प्रति मैल खर्च येईल. रोबोटॅक्सीचा लूक टेस्लाच्या सायबर ट्रकसारखा आहे. यात प्लग-इन-चार्जरऐवजी वायरलेस चार्जिंगची सुविधा आहे, ज्याला इंडक्टिव चार्जिंग म्हणतात.

एलोन मस्कचा दावा आहे की, कंपनीची नवीन कार सध्याच्या जुन्या गाड्यांपेक्षा 10-20 पट सुरक्षित आहे. पूर्ण सेल्फ-ड्रायव्हिंग (FSD) साठी कॅब कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून असेल असे मस्क यांनी म्हटले आहे. टेस्लाने सायबर कॅब सोबत आणखी एक रोबोटॅक्सी देखील सादर केली, ज्याचे नाव रोबोव्हॅन आहे. यामध्ये 20 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. रोबोव्हॅनचे उत्पादन वेळ आणि इतर तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.