Last Surya Grahan of 2023 Timings: आज वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण; जाणून घ्या ग्रहणाची वेळ
Solar Eclipse 2023

2023 वर्षातलं आज (14 ऑक्टोबर) शेवटचं सूर्यग्रहण (Surya Grahan) आहे. ग्रहण ही अदभूत करणार्‍या खगोलीय घटनांपैकी एक गोष्ट आहे. त्यामुळे ज्यांना अवकाशात घडणार्‍या अशा या खगोलीय घटनांचं कुतूहल असतं त्यांना नक्कीच ही घटना आकर्षित करते. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहणाची स्थिती निर्माण होते. सर्वपित्री अमावस्येदिवशी आज सूर्यग्रहण देखील असणार आहे. दरम्यान हे सूर्यग्रहण भारतामधून दिसणार सल्याने तुम्हांला ते थेट डोळ्यांनी पाहता येणार नाही. परंतू  युट्युब वर आजचं सूर्यग्रहण पाहण्याची सोय आहे. 20 एप्रिलला झालेलं पहिलं सूर्यग्रहण देखील भारतात दिसलं नव्हतं.

सूर्यग्रहणाचा कालावधी काय?

आज दिसणारं वर्षातील दुसरे सूर्यग्रहण शनिवार, 14 ऑक्टोबर रोजी रात्री 08:34 वाजता सुरू होईल आणि रविवार, 15 ऑक्टोबर रोजी पहाटे 02:25 वाजता समाप्त होईल. म्हणजेच ग्रहणाचा कालावधी 5 तास 51 मिनिटे असेल. ग्रहण संपताच दुसऱ्या दिवशी सकाळी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे.  दरम्यान भारतामध्ये सूर्यग्रहण दिसणार नसल्याने त्याचे वेधही पाळण्याची गरज नाही. परंतू अनेक जण ग्रहणात काही गोष्टी करणं टाळतात. त्यामध्ये देवपूजेसह, अन्न शिजवण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे.

पहा सूर्यग्रहण

आजचं कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिका, उत्तर आफ्रिकेचा पश्चिम किनारा, अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरात दिसणार आहे. भारतीयांना हे ग्रहण ऑनलाईन पाहता येईल. सूर्यग्रहणात ग्रहणाच्या वेळे आधी 12 तास सुतक काळ सुरू होतो. पण भारतीयांना हे ग्रहण दिसणार नसल्याने सुतक काळ पाळण्याची गरज नसल्याचं शास्त्र सांंगते. नक्की वाचा: Chandra Grahan 2023 Date: 28-29 ऑक्टोबरच्या यंदाच्या वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाचा सुतककाळ कधी होणार सुरू? 

आजच्या सूर्यग्रहणानंतर  15 दिवसांनी, 28 ऑक्टोबर 2023 रोजी चंद्रग्रहण देखील होणार आहे. हे वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण असून ते भारतात दिसणार आहे. त्यामुळे भारतीयांसाठी हे चंद्रग्रहण म्हणजेच 28 ऑक्टोबर रोजी होणारे चंद्रग्रहण दिसणार असून त्याचे भारतामध्ये शारीरिक आणि आध्यात्मिक महत्त्वही असेल. हिंदू धर्मिय ग्रहणाकडे केवळ खगोलीय घटना म्हणून न पाहता  त्याच्याशी त्यांच्या मान्यता, रूढी, परंपरा देखील जोडलेल्या आहेत. त्यामुळे ग्रहणात काही विशिष्ट गोष्टी अवश्य पाळल्या जातात.

टीप -  सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला असून कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही.