भारतामधून यंदा 2022 सालामधलं शेवटचं चंद्रग्रहण (Chandra Grahan) 8 नोव्हेंबर दिवशी दिसणार आहे. त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी (Tripurari Purnima) यंदा चंद्रग्रहणाचा योग आला आहे. दरम्यान 15 दिवसांपूर्वी सूर्यग्रहण झाल्यानंतर आता दिवाळीची सांगता करताना कार्तिकी पौर्णिमेलाही चंद्रग्रहण अनुभवता येणार आहे. भारतात प्रामुख्याने हे ग्रहण ईशान्येकडून राज्यात दिसणार आहे. महाराष्ट्रात मात्र या ग्रहणातच चंद्रोदय होणार आहे. त्यामुळे खगोलप्रेमींना चंद्रग्रहणाचा अदभूत नजारा थेट डोळ्यांनी पाहता येणार आहे.
चंद्रग्रहणाची वेळ
8 नोव्हेंबर दिवशी चंद्रग्रहण दुपारी 2.39 वाजता सुरू होणार आहे. दुपारी 3.47 ते 5.12 या वेळेमध्ये चंद्रबिंब पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थिती निर्माण होईल. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजून 19 मिनिटांनी ग्रहण सुटणार आहे.
मुंबई सह महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये ग्रहणाच्या या कालावधीमध्येच चंद्र उगवणार आहे. हा खंडग्रास स्थितीमध्ये असणार आहे.
मुंबई चंद्रोदय वेळ - 6 वाजून 1 मिनिट
पुणे चंद्रोदय वेळ - 5 वाजून 57 मिनिटं
नाशिक चंद्रोदय वेळ - 5 वाजून 55 मिनिटं
औरंगाबाद चंद्रोदय वेळ - 5 वाजून 50 मिनिटं
नागपूर चंद्रोदय वेळ - 5 वाजून 32 मिनिटं
कोल्हापूर चंद्रोदय वेळ - 5 वाजून 58 मिनिटं
भारतामध्ये पूर्वेकडील राज्यात चंद्रग्रहण खग्रास स्थितीमध्ये दिसणार आहे. कोलकातामध्ये खग्रास स्थितीमध्ये चंद्रग्रहणाच्या वेळेस 4 वाजून 52 मिनिटांनी ब्लड मून दिसणार आहे. तर चंद्र ग्रहण 6.19 ला सुटेल. तत्पूर्वी या ग्रहणाचा नजारा पाहण्याची संधी आहे.
चंद्रग्रहण 2022 सूतक वेळ
लहान मुलं, आजारी व्यक्ती, अशक्त व्यक्ती, गरोदर स्त्रिया यांच्याकरिता वेध पाळण्याचा कालावधी सकाळी 11 वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत असणार आहेत. ग्रहण ही सामान्य खगोलीय घटना असली तरीही शास्त्रानुसार ग्रहणाच्या वेळेस काही नियम पाळण्याची रीत आहे. त्यानुसार रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. बाहेर न पडण्यास सांगितलं जाते. तसेच ग्रहणाच्या काळात काही धार्मिक स्थळ पूजा, अर्चा, दर्शन व्यवस्था बंद करतात. या काळात अन्न न खाण्याचा, न शिजवण्याचा देखील सल्ला काही जण पाळतात.
भारतामध्ये पुढील चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर 2023 दिवशी पाहता येणार आहे. नक्की वाचा: मे महिन्यात एक चंद्रग्रहण झाले होते पहा त्याचे विहंगम फोटोज.
टीप- सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. यामधील गोष्टींची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही.