Jio ने लॉन्च केले JioRail App, रेल्वे तिकीट मिळणार एका क्लिकवर, जाणून घ्या
Jio Smartphone (Photo Crdits- Twitter)

रिलायन्स (Reliance) कंपनी आपल्या जिओ (Jio) धारकांना प्रत्येक वेळी नवीन सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नात असते. अशातच आता जिओने 'जिओरेल'(JioRail) नावाचे नवीन अॅप लॉन्च केले आहे. या अॅपच्या सहाय्याने आता जिओ धारकांना रेल्वेचे तिकीट एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. तर IRCTC रेल्वेचे तिकिटसुद्धा या अॅपच्या मदतीने बुक करता येणार आहे. मात्र कंपनीने Jio Phone आणि Jio Phone 2 या मोबाईलसाठी हे अॅप सुरु केले आहे.

जिओरेल अॅपच्या सहाय्याने ग्राहक रेल्वेचे तिकीट बुक करण्यापासून ते रद्द करण्यापर्यंतच्या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत. तर तत्काळ आणि PNR सारखी सुविधा एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. दरम्यान रिलायन्स जिओ हे रेल्वेसाठी अधिकृतरित्या सुविधा पुरवण्याचे काम करते. त्यामुळे रेल्वेच्या सोयीसुविधांमध्ये बदल होण्यासाठी जिओने जिओरेल हे नवे अॅप सुरु केले आहे.

ग्राहकांना रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा मार्ग अवलंब करावा लागणार आहे. त्याचसोबत PNR स्टेट चेकिंग, ट्रेनचे वेळापत्रक, ट्रेन मार्ग आणि सिट उपलब्धता या संबंधित माहिती या अॅपद्वारे ग्राहकांना मिळणार आहे. ज्या ग्राहकांनी अद्याप IRCTC अकाऊंट सुरु केले नसेल त्यांना ही जिओरेल अॅपद्वारे हे अकाऊंट सुरु करता येणार आहे.

PNR स्टेट चेंज अलर्ट, ट्रेन वेळापत्रक आणि फूड ऑर्डर या सारखी सुविधा लवकरच या अॅपच्या माध्यमातून मिळणार आहे. तर जिओ कंपनी हे अॅप सर्वांना समजेल आणि तिकीट बुक करताना अडचण येणार नाही अशा पद्धतीचे बनवणार आहे. त्यामुळे जिओने आणलेल्या या नव्या अॅपमुळे रेल्वेच्या तिकीट बुकींच्या रांगेत उभा राहण्याचा वेळ वाचणार आहे.