प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

तंत्रज्ञानामुळे जीवन बरेच सोपे झाले आहे. त्यात आता विविध कामांसाठी विविध अॅप्सदेखील दिमतीला आहेत. मनोरंजन, बातम्या, ब्युटी अशी अनेक अॅप्स प्रत्येकाच्याच फोनवर पाहायला मिळतात. मात्र तुम्ही कधी या अॅप्सची विश्वासार्हता तपासून पहिली आहेत? ही अॅप्स सुरक्षित आहेत? याचे उत्तर नाही असेच मिळेल. कारण अशी अॅप्स तुमची खाजगी माहिती साठवून त्यांची बाहेर विक्री करतात. यात तुमचे मॅसेज, कॉन्टॅक्ट, खाजगी फोटो आणि व्हिडिओ यांचाही समावेश आहे. त्यामुळे अशी अॅप्स डाऊनलोड करण्याआधीच वेळीच सावध व्हा. (हेही वाचा : Google चा 22 Apps ना दणका, Play Store वरून हटवली, तुमच्या मोबाईलमधूनही Uninstall करा)

ही अॅप्स आपली माहिती त्रयस्थ कंपन्यांना विकत असल्याचा खुलासा Arrka Consulting ने केला आहे. भारतामध्ये चीनी फोन्सचा बोलबाला आहे. यासोबत अनेक चीनी अॅप्सदेखील आपण वापरत असतो मात्र ही अ‍ॅप भारतीयांची त्यांच्या कामासाठी गरजेची नसलेली माहितीही चोरत आहेत. ही चोरलेली माहिती या अ‍ॅपच्या कंपन्या परदेशी एजन्सीना विकत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अॅप्समध्ये लोकप्रिय अशा Helo, Shareit, TikTok, UC Browser, Vigo Video, Beauty Plus, Club factory Everything, News-Dog, UC news आणि VMate यांचा समावेश आहे.

पुण्यातील Arrka Consulting चे संस्थापक संदीप राव यांनी दिलेल्या माहितीनुसार. ही 10 अॅप्स आणि इतर 50 अॅप्स युजर्सच्या जवळजवळ 45 टक्के माहितीचा अॅक्सेस घेतात. त्यानंतर ही सर्व माहिती बाहेरील 7 कंपन्यांना विकली जाते. यामध्ये त्यांनी कोणती अॅप्स कुठे माहिती पाठवत आहेत याबद्दलही सांगितले. तर, TikTok माहिती चीनी टेलिकॉम कंपन्यांना पाठवत आहे. Vigo Video, Beauty Plus आणि Tencent co ही अ‍ॅप  Meitu ला युजरची माहिती पाठवत आहेत आणि UC Browse अलीबाबा कंपनीला ही माहिती पाठवत आहे.