Job Alert: 5G च्या आगमनाने रोजगाराच्या संधी वाढल्या; 5जी जॉब पोस्टिंगमध्ये 65 टक्क्यांनी वाढ
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

भारतासह इतर अनेक देश 5G स्वीकारण्यासाठी आपापली पावले उचलत आहेत. भारतात लवकरच 5G सेवा सुरू होणार असून याचा फायदा केवळ मोबाईल वापरकर्त्यांना होणार नाही, तर लोकांना रोजगारही मिळणार आहे. असे मानले जात आहे की, 5G सेवा सुरू झाल्यानंतर दूरसंचार क्षेत्रात अनेक नोकऱ्या निर्माण होतील. म्हणजेच येत्या काही महिन्यांत दूरसंचार कंपन्यांमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. गेल्या महिन्यात, 5G-संबंधित दूरसंचार कंपन्यांनी जॉब पोस्टिंगमध्ये 65 टक्के वाढ नोंदवली.

हे प्रमाण जानेवारीमधील 5,265 नोकऱ्यांवरून जुलैमध्ये 8,667 पर्यंत वाढले आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ग्लोबल डेटाच्या जागतिक स्तरावरील 175 कंपन्यांच्या विश्लेषणानुसार, त्याच कालावधीत सक्रिय नोकऱ्यांमध्ये 46 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर त्याच कालावधीत नोकरी बंद होण्यात 75 टक्के वाढ झाली आहे. भारताच्या 5G स्पेक्ट्रम लिलावात जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अदानी समूह शीर्ष बोलीदार म्हणून उदयास आले. भारती एअरटेल ऑगस्टच्या अखेरीस भारतात 5G सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे.

यासह Ericsson, China Telecom, Deutsche Telekom आणि American Tower सारखे प्रमुख ग्लोबल खेळाडूदेखील 2022 मध्ये 5 जी सेवा सुरु करत आहेत. म्हणूनच अनेक टेक कंपन्या नवे अभियंते घेण्याचा विचार करत आहेत. नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेशन, टेस्टिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट यासारख्या नोकऱ्यांसाठी कंपन्या पायाभूत सुविधांचा विकास, उपकरणे, नेटवर्क ऑपरेशन्स आणि स्पेक्ट्रम सेवा यासारख्या क्षेत्रातील तज्ञांना नियुक्त करू शकतात. (हेही वाचा: Elon Musk सुरु करत आहेत स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म? ट्विटरवर दिले संकेत, जाणून घ्या सविस्तर)

महत्वाचे म्हणजे, कंपन्या केवळ 5G गुंतवणूकच नाही तर, 6G गुंतवणूकीमध्येही रस दाखवत आहेत. जानेवारी 2022 ते जुलै 2022 दरम्यान 130 हून अधिक नोकर्‍या 6G वर आधारित पोस्ट केल्या गेल्या आहेत.