Jeff Bezos, Amazon च्या सीईओ पदावरून  होणार पायउतार; Andy Jassy होणार नवे CEO
Amazon CEO & Founder Jeff Bezos (Photo Credits: IANS)

अमेझॉनचे (Amazon) मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील तिसर्‍या तिमाहीमध्ये ते सीईओ पदावरून पायउतार होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान जेफ बेझोस नंतर त्यांच्या जागी अँडी जेसी (Andy Jassy) यांच्याकडे सीईओ पदाची सूत्र येतील असे सांगण्यात आले आहे. सध्या जेसी हे अमेझॉन वेब सर्व्हिसचे प्रमुख म्हणून काम करत आहेत.

करोना संकटकाळामध्ये अमेझॉनने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती. मीडीया रिपोर्ट्स नुसार, 2020 च्या शेवटच्या 3 महिन्यात अमेझॉनला 100 बिलियन डॉलर विक्रीमुळे रेकॉर्डब्रेक नफा झालेला आहे. दरम्यान जेफ बेझोस यांनी स्टार्टअप च्या माध्यमातून अमेझॉनची स्थापना केली होती. बघता बघता अमेझॉनचा पसारा जगभर पोहचला. या कंपनीत भागीदारीमुळे जेफ बेझोस हे जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील ठरले आहेत.

दरम्यान जेफ बेझोस यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना मेल च्या माध्यमातून कंपनीच्या सीईओ पदावर त्यांच्याऐवजी अ‍ॅंडी जेसी यांची नियुक्ती करून भविष्यात ते नव्या प्रोडक्ट्सवर आपलं लक्ष केंद्रीत करतील असे म्हणाले आहेत.

1997 साली अँडी जेसी यांनी अमेझॉन मध्ये आले. तेव्हा ते मार्केटिंग मॅनेजर होते. 2003 साली त्यांनी 57 जणांच्या टीम सोबत AWS ची सुरूवात केली. 2016 साली त्यांची AWS च्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली होती. अ‍ॅंडी जेसी हे अमेझॉन मध्ये सर्वाधिक पगार घेणार्‍यांपैकी एक आहेत.