सध्या जगभरात 'टिक टॉक' (TikTok) हे मोबाईल व्हिडीओ अॅप चांगलेच धुमाकूळ घालत आहे. मात्र यामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या, तसेच यावर तयार होणारे अश्लील व्हिडीओ पाहता मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या अॅपवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. भारतातील विविध ठिकाणांंहूनही या अॅपवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गुगल आणि अॅपल कंपनीला टिक टॉक अॅप प्लेस्टोअर आणि अॅप स्टोअरवरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
(हेही वाचा: तुम्हीपण 'टिक टॉक' Video बनवता? मग आगोदर वयाचा अंदाज घ्या)
कोर्टाने प्रसार माध्यमांना टिक टॉकवरील व्हिडीओ वृत्तवाहिन्यांवर दाखवू नका, असे आदेश दिले होते. त्यानंतर याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर तात्काळ निकाल देण्यास नकार दिल्यावर, आता केंद्र सरकारने यावर उपाययोजना म्हणून हे अॅप काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
टिक टॉक हे एक चीनी अॅप आहे, ज्यावर तुम्ही 15 सेकंदांचे व्हिडीओ बनवू शकता. मात्र हे अॅप बाजारात आल्यावर यावर अश्लील व्हिडीओ बनवण्याचे प्रमाण वाढले. या गोष्टीचा देशातील संस्कृतीवर परिणाम होत असल्याने मद्रास उच्च न्यायालायाने या अॅपवर बंदी घातली होती. आता सर्वोच्च न्यायालयात या गोष्टीची पुढील कारवाई 22 एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान, भारतामध्ये टिक टॉक डाऊनलोड करण्याचे प्रमाण तब्बल 100 मिलियनहून अधिक असल्याची माहिती इंटरनेटवर मिळते. 'इकॉनॉमिक टाईम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रतिमहिना सुमारे 20 मिलियन भारतीय टिक टॉक वापरतात. आता तुम्ही नव्याने टिक टॉक डाऊनलोड करू शकणार नाही, मात्र ज्यांच्याकडे हे अॅप आधीपासून आहे असे लोक ते वापरू शकतात.