Earth Hour Day 2023: आज रात्री एक तासासाठी संपूर्ण जग अंधारात बुडून जाईल; साजरा होत आहे 'अर्थ अवर डे', जाणून घ्या सविस्तर
Earth Hour (File Image)

भारतासह संपूर्ण जग आज एक तास अंधारात बुडून जाईल. यंदा 25 मार्च हा दिवस जगभरात ‘अर्थ अवर डे’ (Earth Hour Day 2023) म्हणून साजरा केला जात आहे. या अंतर्गत जगभरातील लोक आज एका तासासाठी विजेचा वापर पूर्णतः थांबवतील. वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरतर्फे (World Wide Fund for Nature) दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. जगातील निसर्ग आणि हवामान बदलाबाबत लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

अर्थ अवर हा वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर द्वारे जगभरात साजरा केला जाणारा वार्षिक कार्यक्रम आहे. दरवर्षी कोट्यावधी लोक यामध्ये सहभागी होऊन दिवसभरात एका तासासाठी वीज वापरत नाहीत. आज रात्री 08:30 वाजता कार्यक्रम सुरू होईल. तुम्हालाही या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल तर रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत तुम्ही स्वेच्छेने तुमच्या घरातील आणि कामाच्या ठिकाणचे अनावश्यक दिवे आणि विद्युत उपकरणे बंद ठेवू शकता.

अवर डे साजरा करण्यामागील उद्देश निसर्गाची हानी थांबवणे आणि मानवजातीचे भविष्य सुधारणे हा आहे. अर्थ अवरच्या माध्यमातून जगभरातील लोकांना निसर्गाच्या होणाऱ्या नुकसानीची जाणीव करून दिली जाते आणि ते थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले जाते. सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे 31 मार्च 2007 रोजी पहिल्यांदा अर्थ अवर साजरा करण्यात आला. हळूहळू इतर देशांचेही या मोहिमेला सहकार्य मिळाले आणि ही जगातील एक मोठी मोहीम बनली. आज या मोहिमेला भारतासह 172 देशांचा पाठिंबा मिळत आहे. (हेही वाचा: Watch: आकाशात पाहायला मिळाला दुर्मिळ योग; चंद्राच्या मागे अदृश्य झाला सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र)

दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी संपूर्ण जगभर एका तासासाठी अर्थ अवर साजरा केला जातो आणि सर्व विद्युत उपकरणे बंद केली जातात. अर्थ अवर दिवशी जगभरातील बर्‍याच ऐतिहासिक इमारतींचे दिवे बंद ठेवले जातात. यामध्ये न्यूयॉर्कमधील एम्पायर वर्ल्ड बिल्डिंग, दुबईतील बुर्ज खलिफा, पॅरिसमधील आयफेल टॉवर आणि अथेन्समधील अ‍ॅक्रोपोलि अशा 24 जगप्रसिद्ध ठिकाणांचा समावेश आहे.