महिलांना सुरक्षा प्रदान करतील हे '5' सेफ्टी अॅप्स !
सेफ्टी अॅप्स (Photo Credit : Pixabay)

गेल्या काही वर्षात मुली/महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. या घटना फक्त शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही घडताना दिसतात. पण आज सातत्याने आपल्या हातात स्मार्टफोन असतो. याच्या वापराने आपण येणाऱ्या संकटांवर मात करु शकतो. सेफ्टी अॅप्लिकेशन डाऊनलोड करुन तुम्ही सुरक्षित राहू शकता.

रेड आय (redEye)

गुगल प्ले स्टोरवर या अॅपला ५ स्टार्स मिळाले आहेत. या अॅपमध्ये अलर्ट सेट करण्यासाठी काही करण्याची गरज नाही. हे अॅप तुमच्या वागण्यातील बदल, विसंगती यावर अवलंबून आहे. प्रवासात अचानक रस्ता बदलला गेल्यास हे अॅप एक अलर्ट पाठवतो. एकाच जागी खूप वेळ थांबून राहील्यास हे अॅप तुमच्या फ्रेंड्सना अलर्ट पाठवतो. त्याचबरोबर दुसरं कोणी तुमचा फोन बंद करु शकत नाही.

हिंमत

दिल्ली पोलिसांच्या पुढाकाराने या अॅपची निर्मिती झाली आहे. राजधानीसारख्या शहरात मुलींवर अनेक अन्याय, अत्याचार होतानाच्या घटना समोर येऊ लागल्या आणि या अॅपची गरज भासू लागली. या अॅपची रेटींग आहे 4.8. एकदा एका महिलेने एसओएस अलर्ट पाठवल्यावर तिचे लोकेशन, आजूबाजूचा आवाज यांसारखी माहिती ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरुपात कंट्रोल रुमला मिळते. मुलींच्या सुरक्षिततेसाठी बनवण्यात आलेले हे अॅप फ्री आहे.

चिल्ला

चिल्ला म्हणजे ओरडा, मदतीसाठी आवाज द्या. या अॅपची खासियत ही आहे की, तुम्हाला फक्त ओरडायचे आहे. तुमच्या ओरडण्याच्या आधारावरुन अंदाज लावून हे अॅप तुमच्या मित्रांना, कुटुंबातील सदस्यांना तुमचे लोकेशन आणि ऑडिओ पाठवतो. त्याचबरोबर फोनची स्क्रीन अनलॉक न करता आणि अॅप्लिकेशन ओपन न करता तुम्ही या अॅपचा वापर करु शकता. या प्रभावी अॅपला युजर्सनीं 5 स्टार्स दिले आहेत.

प्रतिसाद

हिंमत अॅपप्रमाणेच प्रतिसाद अॅप देखील संकटकाळी महिलांची सुरक्षा करण्यासाठी बनवण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने या अॅपची निर्मिती झाली आहे. 5 स्टार्स असलेले हे अॅप वापरण्यासाठी सोपे आहे. हे अॅप ओपन करुन संकट किंवा डिस्ट्रेस (distress)बटण दाबा. २४ तास सुरक्षा देण्याचे या अॅपचे उद्दीष्ट आहे. त्याचबरोबर लवकरच मेडिकल हेल्प सारख्या सुविधा देण्यासाठी हे अॅप काम करत आहे.

विथ यू (VithU)

चॅनल व्ही च्या टेलिव्हिजन शो गुमराहच्या पुढाकाराने हे अॅप बनवण्यात आले आहे. युजर्सने या अॅपला 5 रेटिंग्स दिले आहेत. इतर अॅपप्रमाणे हे अॅप देखील तुमच्या जवळच्या व्यक्तींना तुमच्या संकटाची सूचना देण्याचे काम करतं. यासाठी तुम्हाला फक्त फोनचे पावर बटण दोनदा दाबावे लागेल.