सध्या दोन टेलिकॉम कंपन्या देशात 5G मोबाईल नेटवर्क सुरू करण्यात आघाडीवर आहेत. हायस्पीड इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी जिओ (Jio) आणि एअरटेल (Airtel) यांच्यात स्पर्धा सुरू आहे. गुरुवारी सकाळी जिओने सांगितले की त्यांनी उत्तराखंडमधील चारधाम येथील मंदिर संकुलांमध्ये हाय-स्पीड 5G सेवा (Airtel 5G Service) सुरू केली आहे. आता एअरटेलने माहिती शेअर केली आहे की, त्यांची अल्ट्रा-फास्ट 5G सेवा आता देशातील 3000 शहरांमध्ये पोहोचली आहे आणि ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
एअरटेलने म्हटले आहे की, जम्मूमधील कटरा ते केरळमधील कुन्नूर, बिहारमधील पाटणा ते तामिळनाडूमधील कन्याकुमारी, अरुणाचल प्रदेशातील इटानगर ते दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशापर्यंत त्यांची 5G सेवा उपलब्ध आहे. अशाप्रकारे एअरटेल 5जी प्लस (Airtel 5G Plus) सेवेची देशातील सर्व प्रमुख शहरी आणि ग्रामीण भागात अमर्याद पोहोच आहे.
कंपनीचे सीटीओ, रणदीप सेखॉन म्हणाले की, ‘आम्ही देशाच्या मोठ्या भागात 5G पोहोचवण्यासाठी खूप उत्सुक आहोत. सप्टेंबर 2023 पर्यंत भारतातील प्रत्येक शहर आणि प्रमुख ग्रामीण भागात पोहोचण्याची आमची वचनबद्धता आहे.’ त्यांनी पुढे सांगितले की, एअरटेल दररोज 30 ते 40 शहरे/नगरे 5G सेवेने जोडत आहे. कंपनी शहरी आणि ग्रामीण भारतातील ग्राहकांनी 5G चा झपाट्याने अवलंब करताना पाहत आहे. एअरटेल 5जी प्लस प्रोपेलर म्हणून काम करेल जे, नवीन व्यवसाय मॉडेल तयार करेल आणि शिक्षण, आरोग्यसेवा, उत्पादन इत्यादी उद्योगांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणेल. (हेही वाचा: TRAI New Rules: खुशखबर! आता मोबाईल फोन्सवर Fake Calls आणि SMS ला बसणार आळा; 1 मे पासून होणार मोठा बदल, घ्या जाणून)
कंपनीचे म्हणणे आहे की एअरटेलने गेल्या एका वर्षात 5G ची ताकद दाखवून दिली आहे. जिओ नंतर एअरटेलने देखील आपल्या वापरकर्त्यांसाठी अमर्यादित 5G डेटा ऑफर केला आहे. एअरटेलची ही ऑफर जिओपेक्षा वेगळी आहे. जिओने वापरकर्त्यांना वेलकम ऑफर म्हणून 5G इंटरनेट सेवा वापरून पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे, तर एअरटेलने आपल्या अनेक प्रीपेड आणि पोस्टपेड योजनांसह अमर्यादित 5G डेटा लॉन्च केला आहे. ही ऑफर 5G सक्षम उपकरणे असलेल्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.