श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) आगामी मालिकेसाठी निवड समितीने टी-20 आणि कसोटी संघ जाहीर केला आहे. भारतीय निवड समितीने अपेक्षित घोषणेमध्ये मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे आता रेड-बॉल संघाची देखील धुरा सोपवण्यात आली आहे. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा आणि रिद्धिमान साहा (Wriddhman Saha) या खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे. पण यापूर्वी एक रोचक घटक समोर आली आहे, आणि ती तब्ब्ल 11 वर्ष जुनी आहे. जेव्हा रोहितला दुखापत झाल्याने साहाने 2010 मध्ये नागपुर (Nagpur) येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) कसोटी पदार्पण केले होते. रोहितच त्याची पहिली कसोटी खेळण्यासाठी सज्ज होता पण नाणेफेकीच्या अवघ्या 15 मिनिटांपूर्वी त्याला घोट्याला दुखापत झाली. याशिवाय व्हीव्हीएस लक्ष्मण देखील जखमी असल्यामुळे आणि रोहित त्याची जागा घेणार असल्याने भारतीय संघाकडे पर्यायांची कमतरता होती. (Wriddhiman Saha: निवडकर्त्यांनी दाखवला बाहेरचा रस्ता, संतप्त यष्टीरक्षकाने प्रशिक्षक राहुल द्रविडवर साधला निशाणा, सौरव गांगुली यांच्यावरही केले आरोप)
त्यावेळी एमएस धोनीच्या नेतृत्वातील टीम इंडिया राहुल द्रविडच्या विना मालिका खेळत होती. आफ्रिकी संघापुर्वी बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यात सध्याच्या भारतीय मुख्य प्रशिक्षकाचा जबडा फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे रोहित आणि लक्ष्मण उपलब्ध नसल्यामुळे साहा एकमेव पर्याय होता. आणि त्याने त्याला एक विशेषज्ञ फलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले. धोनीने विकेट्सच्या मागची जबाबदारी सांभाळली. या सामन्यात भारताला एक डाव आणि फक्त सहा धावांच्या फरकाने मोठा पराभव पत्करावा लागला पण कोलकाता येथे पुढील कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली. त्यानंतर रोहितला कसोटी पदार्पणासाठी आणखी तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागली. त्याने नोव्हेंबर 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सचिन तेंडुलकरची शेवटची मालिका म्हणून स्मरणात असलेल्या मालिकेतून कसोटी पदार्पण केले. आणि पहिल्या व दुसऱ्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली.
अशा परिस्थितीत आता जेव्हा रोहित कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण करत आहे तर साहा याची कारकीर्द संपुष्टात येताना दिसत आहे. साहा असा खेळाडू आहे ज्याच्या खेळाचे सर्वत्र कौतुक होत असले तरी त्याला खेळण्याची संधी फार कमी मिळाली. प्रत्येक वेळी खेळाडू संघाबाहेर पडल्यावर त्याचा समावेश करण्यात आला. पहिले त्याला धोनीमुळे संधी मिळाली नाही. तर त्यानंतर ऋषभ पंतच्या आगमनामुळे तो अधिक वेळ बेंचवर बसून राहिला. आणि आता त्याला कायमचे भारतीय संघाबाहेर बसावे लागणार असे दिसत आहे.