Photo Credit - FB

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) दक्षिण आफ्रिकेतील आगामी एकदिवसीय मालिकेत (IND vs SA) उपलब्ध असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. कोहलीच्या या पत्रकार परिषदेत त्याच्या उपलब्धतेबद्दल आणि एकदिवसीय मालिकेतील कर्णधार रोहित शर्मासोबतच्या (Rohit Sharma) असलेल्या वादावर त्याने आपले मौन सोडले आहे. आपल्या पत्रकार परिषदेत कोहलीने एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेतल्याची प्रतिक्रियाही दिली. तो म्हणाला की, 8 डिसेंबर रोजी, दक्षिण आफ्रिकेसाठी भारताच्या कसोटी संघाची घोषणा होण्याच्या केवळ दीड तास आधी, त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्याची माहिती मिळाली.

बीसीसीआय कडून 8 डिसेंबर रोजी रोहित शर्माकडे भारतीय क्रिकेट संघाच्या एकदिवसीया फॉरमॅटची धुरा सोपवण्यात आली. यापूर्वी विराट कोहलीने टी-20 कर्णधारपद सोडल्यानंतर त्याला टी-20 कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र, कोहलीला कसोटीसह एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सांभाळायचे होते. कर्णधारपदावरून हटल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांनी कोहलीला T20 चे कर्णधारपद न सोडण्याची विनंती केली होती. पण विराट कोहलीचे म्हणणे आहे की, टी-20 संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर या मुद्द्यावर बीसीसीआयशी काहीच बोलले नाही. टी-20 संघाचे कर्णधारपद सोडू नका, अशी विनंती त्याला कधीही करण्यात आली नाही. (हे ही वाचा ICC Women Cricket World Cup 2022: महिला एकदिवसीय विश्वचषक 2022ची घोषणा; भारत-पाकिस्तान संघ 'या' दिवशी पुन्हा भिडणार, जाणुन घ्या वेळापत्रक.)

दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध - विराट कोहली

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेमधून विराट कोहलीनं माघार घेत विश्रांतीसाठी वेळ मागितल्याची जोरदार चर्चा रंगू लागली होती. रोहित शर्मासोबत वाद असल्यामुळेच विराट कोहलीनं एकदिवसीय मालिकेतून माघार घेतल्याचं देखील बोललं जात होतं. त्यासंदर्भात अखेर विराट कोहलीनं मौन सोडलं असून या सर्व अफवा असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. “मी एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध होतो आणि आहे, तुम्ही हे प्रश्न विचारायलाच नकोत”, असं विराट कोहली म्हणाला आहे. पत्रकार परिषदेमध्य माध्यमांनी यासंदर्भात विचारणा केल्यानंतर विराट कोहलीनं यावर सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.

रोहित शर्मासोबतच्या कर्णधारपदाच्या वादावर विराटने सोडले मौन

खरे तर, गेल्या दोन दिवसांपासून कोहली आणि रोहित यांच्यात सर्व काही ठीक नाही, अशी अटकळ होती. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाच्या घोषणेसोबतच विराटकडून कर्णधारपद हिसकावून रोहित शर्माला नवा कर्णधार बनवण्याची घोषणाही करण्यात आली होती. तेव्हापासून बीसीसीआयच्या या निर्णयावरून वाद सुरू झाला होता. त्यानंतर विराट आणि रोहित शर्मामध्ये वाद सुरु असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. त्यावर आता विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या आणि रोहितमध्ये कोणतीही अडचण नाही. गेल्या अडीच  वर्षांपासून मी यावर स्पष्टीकरण देत आहे. या चर्चांमुळे मी आता थकलो आहे,” असे विराट कोहलीने म्हटले आहे