Pakistan Tour of England: फाईव्ह-स्टार हॉटेल नाही इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी खेळाडूंवर आर्थिक संकटामुळे लॉजवर राहण्याची वेळ, तुम्हीच पाहा (View Photos)
पाकिस्तान क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/@Saj_PakPassion)

सध्या इंग्लंड दौर्‍यावर असलेला पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) त्यांच्या प्रशिक्षण व सराव शिबिराच्या दुसर्‍या टप्प्यासाठी डर्बी (Derby) येथे दाखल झाला आहे. क्वारंटाइन कालावधीत संपूर्ण पाकिस्तानी संघ गेल्या 14 दिवसांपासून वॉरेस्टरमध्ये होते. इंग्लंड-पाकिस्तानमध्ये ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान 3 टेस्ट आणि 3 टी-20 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. यजमान इंग्लंडविरुद्ध (England) मालिकेची 5 ऑगस्टपासून मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) येथे सुरुवात होईल. 1 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा संघ पहिल्या कसोटी सामन्याचे ठिकाण मँचेस्टरला जाईल. पण, त्यापूर्वी एक चकित करणारी गोष्ट समोर आली. ऐरवी आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर खेळाडूंच्या राहण्याची सोय फाईव्ह-स्टार हॉटेलमध्ये केली जाते, मात्र पाकिस्तान बोर्डावर (PCB) सध्या ओढावलेलं आर्थिक संकट पाहता त्यांच्या खेळाडूंवर इंग्लंडमध्ये लॉजवर राहण्याची वेळ आली आहे. (ENG vs PAK 2020: इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान टीमला शाहिद आफ्रिदी फाउंडेशनचा सहारा, वाचा काय आहे प्रकरण)

पाकिस्तानी क्रीडा पत्रकार साज सादीकने आपल्या ट्विटर हँडलवर याची माहिती दिली आहे. पाकिस्तानी पत्रकाराने खेळाडूंचे लॉजमध्ये दाखल होतानाचे फोटो शेअर केले आणि लिहिले, "कोण म्हणत की जगभरातीलक्रिकेटर्स 5-स्टार हॉटेल्समध्ये लक्झरीचे जीवन जगतात. पुढील काही आठवडे पाकिस्तान क्रिकेट टीम डर्बी येथील ट्रॅव्हलॉजमध्ये थांबेल."

पाहा हे फोटो:

कोरोनाच्या प्रभावामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. बोर्डाचा आपल्या मुख्य प्रायोजक असलेल्या Pepsi कंपनीसोबतचा करारही संपुष्टात आल्यावर त्यांनी नवीन स्पॉन्सरशीपसाठी निवीदा मागवल्या होत्या. परंतू Pepsi कंपनीचा अपवाद वगळता एकाही नवीन कंपनीने स्पॉन्सरशीपमध्ये आवड दर्शवली नाही, त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर पाकिस्तान टीम शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनचा लोगो लावून खेळणार आहे. दुसरीकडे, सामन्यांचं प्रक्षेपण करण्यासाठी इंटरनॅशनल ब्रॉडकास्टरकडून आकारली जाणारी रक्कम देण्याइतके पैसे नसल्याचं स्थानिक ब्रॉडकास्टर पीटीव्हीने यापूर्वी स्पष्ट केलं, त्यामुळे जोपर्यंत ही रक्कम पीटीव्ही देत नाही तोपर्यंत या सामन्यांचं प्रेक्षपण पाकिस्तानात केले जाणार नाही.