World Wrestling Championship: विनेश फोगाट ने जागतिक कुस्ती स्पर्धेच्या 53 किलो वजनी गटात जिंकले कांस्यपदक, ऑलिम्पिकचे पहिले तिकीट देखील मिळवले
विनेश फोगाट (Photo Credit: IANS)

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकविजेती विनेश फोगाट (Vinesh Phogat) यांनी ग्रीसच्या मारिया प्रेवोलाराकी ला पराभूत करत जागतिक कुस्ती स्पर्धेतील (World Wrestling Championship) कांस्यपदक जिंकले. विनेशचे हे जागतिक स्पर्धेतील पहिले पदक आहे. विनेशने बुधवारी झालेल्या तिसर्‍या सामन्यात प्रीवरार्कीचा 4-1 असा पराभव करून कांस्यपदक जिंकले. यापूर्वी विनेशने रेपेचेजच्या दुसऱ्या फेरीमध्ये अमेरिकेच्या जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाची कुस्तीपटू सारा हिलडरब्रेंटला पराभूत करून कांस्यपदकच्या फेरीत प्रवेश मिळवला आणि पुढील वर्षी टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक साथीच्या तिकिटाची पुष्टी केली. विनेशने 53 किलोच्या गटात ऑलिम्पिकचा कोटा मिळवला. 2020 च्या ऑलिम्पिकसाठीच तिकिट मिळवणारी विनेश पहिला भारतीय कुस्तीपटू आहे. (विनेश फोगाट चा धमाका, 2020 ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिला भारतीय कुस्तीपटू)

याआधी विनेशने पहिल्या सामन्यात युक्रेनच्या युलियावर 5-0 अशी सहज मात दिली होती. दुसरीकडे भारताच्या सीमा बिसलानेही पहिल्या फेऱ्यांमध्ये आश्वासक खेळ केला. मात्र मोक्याच्या क्षणी सीमा दुसऱ्या फेरीत पराभूत झाली. दरम्यान, जागतिक कुस्ती स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये भारतीय महिला कुस्तीपटू पूजा धंदा हिला पराभवाला सामोरे जावे लागले. 2018 वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या कांस्यपदकविजेती पूजाला सेमीफायनल मॅचमध्ये रशियाच्या लिबोव्ह ओवकारोव्हाविरुद्ध 0-10 ने पराभव पत्करावा लागला. पूजा आता गुरुवारी कांस्यपदकाच्या सामन्यासाठी रिंगमध्ये उतरेल.