सायना-कश्यप लवकरच विवाहबंधनात ; या दिवशी बांधणार लग्नगाठ
सायना-कश्यप (Photo Credit : Instagram)

भारताची फुलराणी सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. गेल्या दहा वर्षांपासून प्रेमात असलेले हे दोघेही वर्षाखेरीजपर्यंत विवाहबद्ध होणार आहेत. गेल्या 10 वर्षांपासून असलेले प्रेम त्यांनी ग्रेसफुली सांभाळले आणि प्रेमाच्या नात्याची चर्चा होऊ दिली नाही. इतकी वर्ष हे नाते गुलदस्तात ठेवणे, दोघांनाही चांगले जमले.

या दिवशी रंगणार विवाहसोहळा

वृत्तानुसार, सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप 16 डिसेंबर 2018 रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. कुटुंबातील सदस्य आणि मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडणार आहेत. लग्नसंमारंभाला केवळ 100 लोक उपस्थित असतील. तर 21 डिसेंबरला खास रिसेप्शनचे आयोजन करण्यात येणार आहे.

मैत्री-प्रेम-लग्न

सायना-कश्यपच्या नात्याची खूप दिवसांपासून चर्चा होती. प्रशिक्षक गोपीचंद यांच्याकडून दोघांनीही बॅडमिंटनचे धडे घेतले. त्यामुळे दोघांमध्ये खूप पूर्वीपासून मैत्री होती. मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि आता प्रेमाला विवाहाने पूर्णत्व आणण्यासाठी दोघेही सज्ज झाले आहेत.

खेळाडू कपल्स

दीपिका पल्लीकल-दिनेश कार्तिक, इशांत शर्मा-प्रतिमा सिंग, गीता फोगाट-पवन फोगाट आणि साक्षी मलिक-सत्यवर्त काडयान या खेळाडू कपल्सच्या यादीत आता सायना-कश्यप यांचे नावही सामिल होईल.