प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: stokpic/pixabay)

या वर्षी नोव्हेंबरमध्ये फुटबॉल विश्वचषकाचे (FIFA World Cup 2022) आयोजन केले गेले आहे, ज्याचे यजमानपद कतारकडे (Qatar) असेल. सर्वसाधारणपणे फुटबॉल चाहते हे महागातले महाग तिकीट खरेदी करून जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात सामन्यासाठी पोहोचतात. त्यात विश्वचषक ही अशा चाहत्यांसाठी मेजवानीच आहे. मात्र फिफा विश्वचषकाबाबत आखाती देशात विविध निर्बंध लादले जात आहेत. चाहत्यांना येथे दारू किंवा सेक्स (Sex) मिळणार नाही. फुटबॉल चाहत्यांना खुली चेतावणी देण्यात आली आहे की, या वर्षीच्या विश्वचषकात ‘वन नाईट स्टँड’ (One-Night Stands) केल्यास सात वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

एका पोलीस सूत्राने डेली स्टारला सांगितले की, जोपर्यंत तुम्ही पती-पत्नी म्हणून कतारमध्ये येत नाही तोपर्यंत सेक्स तुमच्यासाठी दूरची गोष्ट ठरू शकते. या स्पर्धेत निश्चितपणे वन-नाईट स्टँड असणार नाही. पार्टी होणार नाही. अशाप्रकारे यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदाच सेक्सवर बंदी घातली गेली आहे. कतारमध्ये विवाहबाह्य लैंगिक संबंध आणि समलैंगिकता बेकायदेशीर आहे.

आधीच हटके आडनाव असलेल्या चाहत्यांना हॉटेलमध्ये खोली मिळणे मुश्कील झाले आहे त्यात असे निर्बंध लादण्यात आल्याने चाहत्यांमध्ये रोष पसरला आहे. मॅचनंतर दारू पिणे, पार्टी करणे ही वर्ल्ड कपनंतरची एक प्रथा राहिली आहे. कतारमधील फिफा 2022 विश्वचषक स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नासेर अल-खतर म्हणाले, ‘प्रत्येक चाहत्याची सुरक्षा आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या ठिकाणी पती-पत्नीही उघडपणे प्रेम व्यक्त करू शकत नाहीत, कारण ते आमच्या संस्कृतीचा भाग नाही. कतार हा एक पुराणमतवादी देश आहे आणि तुम्ही इथे येत असाल तर तुम्हाला नियमांचे पालन करावे लागेल.’

कतार फुटबॉल असोसिएशनचे सरचिटणीस मन्सूर अल अन्सारी समलैंगिकतेबाबत म्हणाले, ‘स्पर्धेदरम्यान रेनबो ध्वजांवर बंदी घालण्याचा विचार केला जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला एलजीबीटीबद्दलचा तुमचा दृष्टिकोन उघडपणे दाखवायचा असेल, तर तो स्वीकारार्ह असलेल्या समाजात दाखवा. अशा गोष्टींना कतारमध्ये स्थान नाही.’ (हेही वाचा: पाकिस्तानमध्ये महिला क्रिकेटपटूचा विनयभंग, राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक निलंबित, व्हिडीओच्या माध्यमातून करायचा ब्लॅकमेल)

दरम्यान, फिफा विश्वचषक 2022 हा 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे आणि 27 दिवसांमध्ये या प्रतिष्ठित ट्रॉफीसाठी 32 संघ लढत आहेत. या स्पर्धेचा समारोप ख्रिसमसच्या एक आठवडा आधी म्हणजे 18 डिसेंबर रोजी होणार आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, रॉबर्ट लेवांडोस्की आणि लुईस सुआरेझ यांच्यासाठी हा शेवटचा विश्वचषक ठरू शकतो.