कोल्हापूर (Kolhapur) येथे सरावाची कुस्ती खेळताना एका उमद्या पैलवानाचा मृत्यू झाला आहे. मारुती सुरवसे (Maruti Survase) असे या पैलवानाचे नाव असून तो केवळ 23 वर्षांचा आहे. तो पंढरपूर जवळील वाखरी गावचा आहे. कोल्हापूर येथे तो पैलवानकीचा सराव करण्यासाठी तालमीत राहात होता. मारुती पैलवानाचा मृत्यू हृदयविकारच्या झटक्याने झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्या मृत्यूची बातमी (Wrestler Dies in Wrestling Practice ) समजताच वाखारी गावावर शोककळा पसरली. कोल्हापूरातील एका तालमीत कुस्तीचा सराव सुरु होता. सराव संपला आणि मारुतीच्या छातीत अचानक दुखायला सुरुवात झाली.
पैलवान मारुती याला सोबतच्या पैलवानांनी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याची वैद्यकीय चाचणी केली. मात्र, त्यांनी त्याला मृत घोषीत केले. त्याच्या मृत्यमुळे कोल्हापूरातील कुस्तीविश्वातही शोककळा पसरली आहे. मारुती पैलवानाला कुस्तीचा नाद होता. पाठिमागील वर्षापासून तो कुस्ती करत होता. कुस्तीचे अधिक ज्ञान प्राप्त व्हावे आणि पुढेही आपल्या कुस्तीची किर्ती पसरावी यासाठी तो कोल्हापूरात राहून सराव करत होता, अशी प्राथमिक माहिती आहे. पाठिमागील वर्षापासूनच त्याने कुस्तीला सुरुवात केली होती. त्यामुळे एका उमद्या पैलवानाची कारकिर्द सुरु होण्यापूर्वीच संपल्याची भावना कुस्तीशौकीनांतून व्यक्त केली जात आहे.
मारुती अत्यंत सामान्य कुटुंबातून येतो. त्याचे वडील वाखारी गावात शेती करतात. मारुतीच्या वडीलांनाही कुस्तीचा नाद होता. आपल्या मुलाने कुस्तीत नाव कमवावे यासाठी त्यांनी त्याला कोल्हापूरात ठेवले होते. मारुतीलाही कुस्तीचा नाद होताच. त्यामुळे बापलेकांनी आणि कुटुंबीयांनी मिळून हा निर्णय घेतला होता. दरम्यान, सर्वांच्याच स्वप्नाचा चक्काचूर झाला आहे. कोल्हापूर ही कुस्तीपंढरी म्हणून ओळखली जाते.
कोल्हापूरमध्ये कुस्तीसाठी राज्यभरातून आणि देशभरातूनही पैलवान येत असतात. कोल्हापूरमध्ये कुस्तीसाठी विशेश यंत्रणा असते. कोल्हापूरच्या तालमी कुस्तीसाठी अधिक प्रसिदध आहेत. कोल्हापूरच्या तालमीतून एकापेक्षा एक असे अनेक सरस पैलवान राज्याला मिळाले आहेत. पाठिमागील कैक वर्षांची परंपरा आजही पुढे सुरु असल्याचे पाहायला मिळते.