बॉक्सर ज्योती प्रधान (Indian Boxer Jyoti Pradhan ) हिचे पंचिंग बॅग सोबत सराव करताना निधन झाले. तिचे वय अवघे 20 वर्षे इतकेच होते. ज्योती हिने राष्ट्रीय चॅम्पीयनशिप स्पर्धेत पश्चिम बंगाल (West Bengal) राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. बुधवारी (3 जुलै 2019) ती नेहमीप्रमाणे पंचिंग बॅगसोबत बॉक्सिंगचा सराव करत होती.दरम्यान, कार्डियक अरेस्ट (Cardiac Arrest) आल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात मात्र तिच्या मृत्यूचे नेमके कारण पुढे आले नाही. ज्योतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर ज्योतिच्या मृत्युचे नेमके कारण समजू शकणार आहे.
ज्योती ज्या क्लबमध्ये अभ्यास आणि सराव करत होती त्या क्लबकडून WBABF म्हणजे पश्चिम बंगाल एमेच्युर बॉक्सर महासंघानेही या घटनेचा सविस्तर अहवाल मागवला आहे. प्राप्त माहितीनुसार, बॉक्सर ज्योती प्रधान हिने पहिल्यांदा एका सहकाऱ्यासोबत रिंगमध्ये बॉक्सिंगचा सराव केला. त्यानंतर तिने पंचिंग बॅगसोबत सराव करण्यास सुरुवात केली. पंचिंग बॅगसोबत सराव सुरु असताना साधारण 4.30 वाजण्याच्या सुमारास ती अचानक खाली कोसळली आणि बेशुद्ध झाली. तिच्या प्रशिक्षकांनी तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती शुद्धीवर येऊ शकली नाही. त्यानंतर तीला एसएसकेएम रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णालयात दाखर करण्यात आले तेव्हा तिचा श्वासोच्छ्वास सुरु होता. मात्र, पुढील उपचारासाठी तिला अतिदक्षता (एमरजेंसी वॉर्ड) विभागात दाखल करण्यात आले. तेव्हा, तिला कार्डियक अरेस्ट आला. ज्यात तिचा मृत्यू झाला.
राज्य मंत्री सोवनदब चट्टोपाध्याय यांनी सांगितले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पंचिंग बॅग सोबत सराव करताना मृत्यू झाल्याचे मी यापूर्वी कधीच ऐकले नाही. आपल्या सहकाऱ्यासोबत, प्रतिस्पर्ध्यासोबत बॉक्सिंग करताना आपण जखमी, अत्यावस्त होऊ शकता. पण, पंचिंग बॅगसोबत सराव करताना मृत्यू होणे हे मी कधीच पाहिले किंवा ऐकलेही नाही. उल्लेखनीय असे की, मंत्री सोवनदब चट्टोपाध्याय हे सुद्धा कॉलेजच्या दिवसात एक बॉक्सर राहिले आहेत. (हेही वाचा, पुणे: राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या जलतरणपटूची गळफास लावून आत्महत्या, पोलिसांकडून तपास सुरु)
ज्योती प्रधान हिच्या अशा प्रकारे मृत्यू होण्याबाबत अनेक बॉक्सर्सनीसुद्धा आश्चर्य व्यक्त केले आहे. WBABF सचिवांनी म्हटले आहे की, ज्योती प्रधान ही अत्यंत हुशार आणि गुणी खेळाडू होती. तिच्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नेतृत्व करण्याची क्षमता होती.
ज्योती प्रधान ही कोलकाता येथील जोगेश चंद्र लॉ कॉलेजची विद्यार्थीनी होती. ती किडरपोर येथील भुकैलाश रोड येथे राहात होती. ती अगदी तंदुरूस्त होती. शालेय जीवनापासूनच बॉक्सिंग क्षेत्रात तीने आपली ओळक निर्माण केली होती.