जुनिअर गोल्फर अर्जुन भाटीने विकले खास शूज (Photo Credit: Twitter/arjunbhatigolf)

कोविड-19 विरुद्ध लढा देण्यासाठी भारतात लॉकडाउनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. क्रीडा दिग्गज देखील पुढे येत आहेत आणि कोरोना विषाणूच्या साथीवर मात करण्यासाठी मदत करत आहेत. युवा गोल्फर अर्जुन भाटीने (Arjun Bhati) पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. अर्जुनने त्याचे बूट 3,30,000 रुपयांमध्ये विकले आणि सर्व निधी पीएम-केअर्स फंडमध्ये (PM- CARES Fund) दान केला. हे बूट असे तसे नव्हे तर हेच तुटलेले बूट घालून अर्जुनने अमेरिकेत झालेली जूनियर गोल्फ वर्ल्ड चॅम्पियनशिप 2018 स्पर्धा जिंकली होती. अर्जुनने स्वतः याची माहिती ट्विटरवरून जाहीर केली. अर्जुनचे ते बूट त्याचे काका विनीश प्रधान जी यांनी विकत घेतले. यापूर्वी अर्जुनने आपली ट्रॉफी आणि कमाई 102 लोकांना दिली. अर्जुनने ट्विट केले की, त्याने देशातून आणि परदेशातून जिंकलेल्या 102 ट्रॉफी या संकटाच्या वेळी 102 लोकांना दिले आहेत. आणि त्यातून मिळालेले 4,30,000 रुपये त्याने पीएम-केअर्स फंडमध्ये दान केले. (Bharat Army च्या साथीने केएल राहुल मुलांसाठी गोळा करणार निधी; वर्ल्ड कप 2019 बॅट, जर्सी आणि इतर गीअर्स लिलावासाठी केले दान)

तब्बल 150 गोल्फ स्पर्धा खेळल्या 15 वर्षीय अर्जुनने मागील वर्षी कॅलिफोर्नियामध्ये ज्युनियर वर्ल्ड गोल्फ स्पर्ध जिंकली होती. याआधी त्याने 2016 मध्ये अंडर -12 आणि 2018 मध्ये अंडर -14 किड्स गोल्फ वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहेत. दरम्यान, आता अर्जुनने 2018 जूनियर गोल्फ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये परिधान केलेले बूट दान केले. अर्जुनने ट्विट करून लिहिले की, "अमेरिकेतील जूनियर गोल्फ वर्ल्ड चैम्पियनशिप2018मध्ये मी ज्या तुटलेल्या शूजसह ट्रॉफी जिंकली ती काका विनीश प्रधान जी यांनी 3,30,000 ते मध्ये घेतले आणि मी पैसे पीएम-केअर्सला दान केले." अर्जुन पुढे म्हणाला आपण असो किंवा नसो, देश असला पाहिजे.

चीनमधून पसरलेल्या प्राणघातक कोरोना विषाणूविरूद्ध लढ्यात भारतीय नागरिकही हातभार लावत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींसह मोठ्या संख्येने लोकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. कोरोना विषाणूमुळे जगभरातील मोठ्या संख्येत लोकांनी आपला जीव गमावला आहे. भारतातही या विषाणूचे रुग्ण सातत्याने समोर येत आहे आणि सध्या ही संख्याही 14,000 वर पोहोचली आहे.