Common Wealth Games 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची सहाव्या पदकाची कमाई, वेटलिफ्टर अचिंता शेउलीने पटकावलं सुवर्णपदक!

स्नॅचमध्ये भारताच्या अचिंता शेउलीने (Achinta Sheuli) सुवर्णपदक जिंकत बर्मिंगहॅममध्ये (Birmingham) तिरंगा फडकावला. कॉमनवेल्थ स्पर्धेत (Common Wealth Games 2022) सहभागी झालेल्या अचिंता शेउलीने भारताला (India) राष्ट्रकुल स्पर्धेत तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई करुन दिली. अचिंता शेउलीने पहिल्या लिफ्टमध्ये 137 किलो वजन तर दुसऱ्या लिफ्टमध्ये 139 किलोचा वजन  उचलले. यानंतर अचिंताने तिसऱ्या लिफ्टमध्ये 143 किलो वजन उचलले. क्लीन अँड जर्कमध्ये अचिंता शेउलीने दुसऱ्या प्रयत्नात 170 किलो वजन उचलले. अशाप्रकारे त्याने 313 किलो वजन उचलून भारताला सहावं पदक मिळवून दिलं. वेटलिफ्टर अचिंता शेउलीने  पुरुषांच्या 73 किलो गटात भारतासाठी तिसऱ्या वेटलिफ्टिंग सुवर्णपदकाची (Goldmedal) कमाई केली आहे.

 

स्वत:साठीचं नाही तर देशासाठी योगदान दिल्या बाबत अचिंता शेउलीने आनंद व्यक्त केला आहे. तसेच अनेक संघर्षांवर मात केल्यानंतर मी हे सुवर्णपदक जिंकले, हे पदक मी माझ्या भावाला आणि प्रशिक्षकांना समर्पित करतो, अशी प्रतिक्रीया अचिंता शेउलीने सुवर्णपदक पटकावल्यानंतर दिलेली आहे. तसेच तो पुढे ऑलिम्पिकसाठी (Olympics) तयारी करणार असल्याची माहिती देखील माध्यमांना दिली आहे. याआधी रविवारी जेरेमी लालरिनुंगाने (Jeremy Lalrinnunga) वेटलिफ्टिंगमध्ये (Weight Lifting) सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. बर्मिंगहॅम 2022 कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो भारतातील पहिला पुरुष खेळाडू तर अचिंता सुवर्णपदक जिंकणारा दुसरा पुरुष खेळाडू ठरला आहे.

 

2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत भारताला सहा पदके मिळाली असून सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत.  भारताच्या खात्यात सहा पदकांची कमाई करत भारतीय वेटलिफ्टिंग सुवर्णपदक विजेती मीराबाई चानू (Mirabai Chanu), जेरेमी लालरिनुंगा, अचिंता शेली आणि कांस्यपदक विजेता गुरुराजा पुजारी (Gururaja Poojary) यांनी एकत्र येत फोटोसाठी खास पोझ दिली. तरी देशभरातून या सगळ्या स्पर्धकांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.