सायना नेहवाल, परुपल्ली कश्यप (Photo Credit: Getty Images)

चायना ओपनच्या पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर भारताची अनुभवी शटलर सायना नेहवाल (Saina Nehwal) स्पर्धेतून बाहेर पडली आहे. सायनाला स्पर्धेच्या पहिल्या फेरीत चीनच्या चाय यान हिच्या हातून पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या सायनाला महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत यानने सरळ गेममध्ये अवघ्या 24 मिनिटांत 9-21,12-21 असे पराभूत केले. दुसरीकडे, पुरुष ऐकेरीत सायनाचा पती आणि वैयक्तिक प्रशिक्षक परुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) याने थायलंडच्या सिथिकॉम थमसिनविरुद्ध सरळ गेममध्ये सहज विजय नोंदविला आणि दुसऱ्या फेरीत स्थान निश्चित केले. कश्यपने थायलंडच्या प्रतिस्पर्धीला 43 मिनिटांत 21-14 21-3 असे पराभूत केले. आता दुसऱ्या फेरीत कश्यपचा सामना विक्टर एक्सेलसन (Victor Axelsen) याच्याही होईल. (China Open 2019: चायना ओपनच्या पहिल्या फेरीत पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय यांचा पराभव)

प्रणव जेरी चोपडा आणि सिक्की रेड्डी यांची मिश्र दुहेरी जोडीही पहिल्या फेरीत पराभूत झाली. चोपडा आणि सिक्कीला वांग ची लिन आणि चेंग ची या चिनी तैपेई जोडीकडून 21-14, 21-14 ने पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱ्या पुरुष एकेरी सामन्यात भारताच्या साई प्रणीत (B Sai Praneeth) यानेही दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या बी साई प्रणीतने खडतर सामन्यात जागतिक क्रमवारीत 16 व्या क्रमांकाचे टॉमी सुगीआर्तो याचा पराभव केला. प्रणीथने हा सामना 15-21, 21-12, 21-10 ने जिंकला. विश्वविजेत्या पीव्ही सिंधूलाही मंगळवारी तिच्या खालच्या मानांकित चिनी तैपेईच्या पाय यू पो याच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.

जानेवारीत इंडोनेशिया मास्टर्स पदक जिंकल्यापासून 29 वर्षीय सायना तिच्या फिटनेसशी संघर्ष करत आहे. सलग तीन टूर्नामेंटच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडल्यानंतर सायनाने मागील महिन्यात फ्रेंच ओपनची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.