पीव्ही सिंधू (Photo by Robertus Pudyanto/Getty Images)

भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) हिचे खराब प्रदर्शनअजूनही सुरूच आहे. चायना ओपन (China Open) मध्ये खालच्या स्थानी असलेल्या एका खेळाडूकडून सिंधूला पराभव पत्करावा लागला. यासह सिंधू पहिल्याच फेरीत या स्पर्धेतून बाहेर पडली आहे. मंगळवारी चिनी तैपेई ची खेळाडू पाय यू पो (Pai Yu Po) हिने पहिल्याच सामन्यात सिंधूला 13-21 21-18 19-21 ने पराभूत केले. अलीकडे विश्वविजेतेपद जिंकणार्‍या सिंधूला चायना ओपनच्या पहिल्या फेरीत बाहेर करत चिनी तैपेईच्या खेळाडूने स्पर्धेत मोठा उलटफेर केला आहे. पहिल्या सेटमध्ये सिंधूने शानदार खेळ दाखवत गेम 21-13 असा जिंकला. पण नंतर चिनी तैपेई खेळाडूने दुसऱ्या सेटमध्ये जोरदार पुनरागमन केले. या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली लढत पाहायला मिळली. दुसर्‍या गेममध्ये तिने सिंधूला मागे टाकत 21-18 असा गेम जिंकला आणि मॅचमध्ये बरोबरी साधली.

यानंतर तिसर्‍या गेममध्येही दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार झुंज पाहायला मिळाली. अंतिम गेम 21-19 नंतर जिंकल्यानंतर पोने स्पर्धेत मोठा उलटफेर घडवून आणला आणि दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. दोन्ही खेळाडूंमध्ये हा सामना 74 मिनिटांपर्यंत चालला.

दुसरीकडे, पुरुष एकेरी स्पर्धेत भारताची खूप निराशाजनक राहिली आणि अनुभवी खेळाडू एचएस प्रणॉय (HS Prannoy) हादेखील पहिल्याच सामन्यात पराभूत झाला. आजारामुळे मागील दोन स्पर्धांतून बाहेर राहिलेल्याप्रणॉयचे पुनरागमन निराशाजनक राहिले. प्रणॉयला या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत डेन्मार्कचा खेळाडू रॅसमस गेम्केविरुद्ध 17-21 18-21 असा पराभवाला सामोरे जावे लागले. महिला दुहेरी जोडी एन सिक्की रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनाही पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. केवळ 30 मिनिटे चाललेल्या या सामन्यात भारतीय जोडीला चीनच्या जोडीने 9-21,8-21 ने पराभूत केले. दुसरीकडे, दिवसाच्या पहिल्या सामन्यात भारताच्या मिश्र दुहेरीत जोडीने विजय मिळवत विजयी सलामी दिली. 35 मिनिटं चाललेल्या या सामन्यात सात्विकसाईराज रंकी रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने विजय मिळविला. त्यांनी कॅनडाच्या जोडीवर 21-19,21-19 अशी मात केली.