बलबीर सिंह सीनियर | फाइल फोटो | (Photo Credits- Facebook @balbirsinghsenior)

भारतीय हॉकीचे (Hockey) महान माजी खेळाडू बलबीर सिंह सिनिअर (Balbir Singh Sr) यांना 13 मे रोजी आणखी दोन हृदयविकाराचे झटके बसले. न्यूमोनियामुळे 96 वर्षीय ज्येष्ठ खेळाडूला शुक्रवारी मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात (Fortis Hospital) दाखल करण्यात आले होते. बलबीर सिंह यांच्या नातूने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी त्यांना दोनदा हृदयविकाराचा झटका देखील आला आणि त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांची प्रकृती अजून खालावली नाही परंतु ती अजूनही अत्यंत नाजूक आहे आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहेत. सिंह यांच्या नातूने एएनआयला म्हटले की, "हॉकी ऑलिम्पियन बलबीरसिंग सीनियर यांना काल आणखी दोन हृदयविकाराचे झटके बसले. त्यानंतर त्यांची प्रकृती अजून खालावली नाही. मात्र, अद्याप त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे." ते पुढे म्हणाले, “त्यांना अजूनही फोर्टिस हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये ठेवले आहे. चिकित्सक त्यांच्या प्रकृतीचे सातत्याने आकलन करत असतात.” (3 ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता Balbir Singh Sr यांची प्रकृती चिंताजनक, जाणून घ्या मेडिकल अपडेट)

शुक्रवारी प्रकृती बिघडल्यामुळे बलबीर वरिष्ठ यांना सेक्टर-36 मधील त्यांच्या निवासस्थामी येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. गेल्या वर्षी जानेवारीत बलबीर सीनियर यांना 108 दिवस रूग्णालयात घालवून पीजीआयएमआरमधून डिस्चार्ज देण्यात आले होते. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनीही हॉकी लीजेंडच्या रिकव्हरीसाठी शुभेच्छा दिल्या. “बलबीर सिंह सिनिअर जी यांना आज हृदयविकाराचा झटका आला हे ऐकून मला वाईट वाटले आणि आता आयसीयू मध्ये गंभीर स्थितीत आहे. लवकरात लवकर त्यांनी बरे व्हावे यासाठी प्रार्थना,” अमरिंदर यांनी मंगळवारी ट्विट केले.

लंडन (1948), हेलसिंकी (1952) आणि मेलबर्न (1956) ऑलिम्पिकमध्ये भारताच्या सुवर्णपदक कामगिरीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये नेदरलँड्सविरुद्ध 6-1 च्या विजयात त्यांनी पाच गोल केले, हा विश्वविक्रम अजूनही अबाधित आहे. 1957 मध्ये त्यांना प्रतिष्ठित पद्मश्री देखील प्रदान करण्यात आले. निवृत्तीनंतर ते 1975 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे व्यवस्थापक देखील होते.  भारताच्या 1975 वर्ल्ड कप स्पर्धेत सुवर्ण पदक आणि 1971 मध्ये कांस्य पदकजिंकणाऱ्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते.