रोहित शर्मा, विनेश फोगाट (Photo Credit: Facebook/Instagram)

भारताचा उपकर्णधार आणि सलामी फलंदाज फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याची 4 खेळाडूंसह भारताच्या सर्वोच्च क्रीडा सन्मान - राजीव गांधी खेल रत्न (Rajiv Gandhi Khel Ratna) पुरस्कारासाठी शिफारस केली गेली आहे, वृत्तसंस्था PTIने सांगितले. रोहित बरोबर आशियाई खेळातील सुवर्णपदकविजेती विनेश फोगाट (Vinesh Phogat), टेबल टेनिस चॅम्पियन मनिका बत्रा (Manika Batra) आणि पॅरालंपिक सुवर्णपदक विजेता मरियप्पन थांगावेलू (Mariyappan Thangavelu) यांचीही खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन आणि अन्य राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या निर्णयासाठी निवड समितीने मंगळवारी बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. 2016 नंतर प्रथमच या पुरस्कारासाठी 4 खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर रोहित हा पुरस्कार मिळवणारा फक्त चौथा क्रिकेटपटू बनू शकतो. 1998 मध्ये खेल रत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या सचिनचा पहिला क्रिकेटपटू होता. (Khel Ratna Award 2020: रोहित शर्माऐवजी केवळ 3 क्रिकेटपटूंनाच मिळाला क्रीडा क्षेत्रातला मानाचा सन्मान, वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराचाही आहे समावेश)

भारतीय संघाचा मर्यादित षटकांचा उपकर्णधार रोहितने गेल्या काही वर्षांत संघासाठी शानदार कामगिरी केली आहे. रोहितने एक क्रिकेटपटू म्हणूनच नव्हे तर कर्णधार म्हणूनही स्वत: ला सिद्ध केले आहे. म्हणूनच राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी तयार करण्यात आलेल्या निवड समितीने ज्यात स्वत: माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा समावेश आहे त्याने रोहितला खेलरत्न देण्याची शिफारस केली आहे. 2007 मध्ये टी-20 विश्वचषकात भारताचे यशस्वी नेतृत्व केल्यावर धोनीला क्रीडा सन्मान मिळाला तर विराटने 2018 मध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानूसमवेत हा पुरस्कार जिंकला होता. विनेश फोगट 2018 मध्ये आशियाई खेळांचे सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरली तर स्टार पॅडलर मनिका बत्रासाठी 2018 एक उल्लेखनीय वर्ष ठरले. यावर्षी तिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक व महिला एकेरीत आशियाई खेळांचे कांस्यपदक जिंकले.

दरम्यान, हाय जंप (टी42) मध्ये सुवर्णपदक जिंकून मरियप्पन थांगावेलूने रिओ पॅरालंपिक खेळांमध्ये इतिहास रचला. 2019 मध्ये खेलरत्न पुरस्कार पॅरालंपियन दीपा मलिक आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी जिंकला होता.