IND vs SA 2nd Test Day 2: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध विराट कोहली याचे रेकॉर्ड 7 वे दुहेरी शतक, डॉन ब्रॅडमन देखील राहिले मागे
डॉन ब्रॅडमन, विराट कोहली (Photo Credit: Getty)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघात दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु आहे. भारताने पहिल्या डावात 4 गडी गमावून 400 धावांचा टप्पा ओलांडला आहे. यादरम्यान, कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टेस्टमधील सातवे दुहेरी शतक केले. टेस्टमध्ये 7 दुहेरी शतक करणारा विराट हा पहिला कर्णधार आहे. पुणे कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी शानदार फलंदाजी करत कोहलीने दुहेरी शतक झळकावले. विराटने याआधी जवळपास 11 महिन्यानंतर टेस्ट क्रिकेटमध्ये शतक केले होते. विराटने मागील वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यानच्या पर्थ टेस्टमध्ये अंतिम शतक केले होते. हे कसोटी कारकिर्दीतील त्याचे 26 वे शतक होते. यानंतर, त्याने 150 धावांच्या पलीकडे स्कोअर गाठला आणि  ऑस्ट्रेलियाचे दिग्गज डॉन ब्रॅडमन (Sir Don Bradman) यांना मागे टाकले आहेत. कर्णधार म्हणून कोहलीने 9 वेळा 150 किंवा अधिक धावा केल्या आहेत. या यादीमध्ये आतापर्यंत कोहली ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ब्रॅडमन यांच्याबरोबर संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. (IND vs SA 2nd Test Day 2: 26 वे टेस्ट शतक करत विराट कोहली ने केली स्टिव्ह स्मिथ, रिकी पॉन्टिंग यांची बरोबरी)

कोहलीने कसोटीत 6 दुहेरी शतक ठोकणार्‍या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांनादेखील मागे सोडले. ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉटिंग, श्रीलंकेचा मर्वण अटापट्टू, पाकिस्तानचे जावेद मियांदाद आणि युनिस खान यांनीही प्रत्येकी 6-6 दुहेरी शतके केली आहेत. आता भारताकडून कसोटीत सर्वाधिक दुहेरी शतक ठोकण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दुहेरी शतकासह कोहलीने कर्णधार म्हणून सातव्यांदा दुहेरी शतक केले आहेत, जो की एक विश्वविक्रम आहे. वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार ब्रायन लारा कर्णधार म्हणून 5 दुहेरी शतकासह दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे विराटने हा विक्रम त्याच्या कर्णधार म्हणून 50 टेस्ट मॅचमध्ये केला आहे. शिवाय, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्याने कोहलीने ब्रॅडमन यांना मागे टाकले आहे. ब्रॅडमन यांनी कसोटीत 6996 धावा केल्या. कोहलीने आता त्यांना मागे टाकले आहे.

कर्णधारपदी कसोटीत दुहेरी शतकाच्या खेळीसह कोहलीने सर्वाधिक 150 पेक्षा अधिक डावांचा विक्रमही कोहलीने नोंदविला. त्याने ब्रॅडमन, दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ (Greame Smith) , श्रीलंकेचा माहेला जयवर्धने (Mahela Jayawardene), ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क आणि वेस्ट इंडिजचा लारा यांना मागे सोडले. सध्या सुरु असेलेल्या मॅचमध्ये कोहलीने रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्यासोबत 100 धावांची भागीदारी केली आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सध्याच्या मालिकेत दुहेरी शतक करणारा विराट मयंक अग्रवाल याच्यानंतर दुसरा फलंदाज आहे. मयंकने पहिल्या टेस्टच्या पहिल्या डावात दुहेरी शतक करत 215 धावा केल्या होत्या.