रविचंद्रन अश्विन आणि चेतेश्वर पुजारा (Photo Credit: Facebook, Instagram)

IND vs ENG Test Series 2021: ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच घरी पराभव केल्यावर टीम इंडिया (Team India) आता इंग्लंडविरुद्ध (England) घरच्या मालिकेसाठी सज्ज होत आहे. जो रूटच्या इंग्लंड संघाविरुद्ध आगामी कसोटी मालिकेत कोणत्याही फिरकीपटूविरुद्ध खेळपट्टीवर पुढे जाऊन मोठा फटका मारण्याचं ओपन चॅलेंज भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) संघातील सहकारी चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) केले आहे. भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर (Vikram Rathour) यांनी आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर संभाषणात म्हटले की अश्विनने पुजाराला हे आव्हान पूर्ण केल्यास तो आपली अर्धी मिशी उडवून टाकेन आणि तसाच मैदानावर खेळण्यासाठी हजर होईन,” असं अश्विनने म्हण्टल्याचं सांगितलं. "पुजाराला ऑफस्पिनरच्या चेंडूवर वरून शॉट मारताना पाहायला मिळेल का?" अश्विनने फलंदाजी प्रशिक्षकाला हा प्रश्न विचारल्यापासून सुरुवात झाली. (IND vs ENG Test Series 2021: टीम इंडियाला टक्कर देण्यासाठी इंग्लंड फलंदाज राहुल द्रविड कडून घेणार धडे, कसे ते पहा!)

“कार्य प्रगतीपथावर. मी पुजाराला अनेकदा सांगतो की पायांचा वापर करून पुढे ये आणि डोक्यावरून हवेत फटका मार. कमीतकमी एकदा तरी मी सांगतोय तसा प्रयत्न कर. पण तो दरवेळी मला वेगळी कारणं देतो. कारण तो अद्यापही माझं म्हणणं मान्य करत नाहीये,” राठोड यांनी प्रतिक्रिया देत म्हटले. यावर अश्विनने मजेदार चॅलेंज देत म्हटलं की, “आता सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत जर पुजाराने पायांचा वापर करून पुढे येऊन मोईन अली किंवा कोणत्याही फिरकीपटूला हवाई फटका खेळून दाखवला तर मी माझी अर्धी मिशी उडवून टाकेन आणि तसाच मैदानावर खेळण्यासाठी हजर होईन.” “हे आव्हान खरंच खूप रंजक आहे. मला वाटतं की पुजाराने आता तरी हे आव्हान स्वीकारायला हवं, पण खरं पाहता मला विश्वास आहे की तो असं करणार नाही”, राठोड म्हणाले.

आपल्या बचावात्मक पध्दतीबद्दल अनेकदा टीकेला सामोऱ्या जाणाऱ्या पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात लढाऊ फलंदाजी केली. त्याने शरीरावर, बोटांवर आणि डोक्यावर गोलंदाजांचा हल्ला सहन केला, पण माघार घेतली नाही. दरम्यान, पुजाराने भारतासाठी 81 कसोटी सामने खेळून त्यात 6,111 धावा केल्या आहेत ज्यात 18 शतकांचा समावेश आहे.