ICC WTC Final 2021: न्यूझीलंडने भारताला पाजले पराभवाचे पाणी, 'हे' खेळाडू ठरले टीम इंडियाच्या पराभवाचे खलनायक!
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs NZ WTC Final 2021: भारताविरुद्ध (India) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या  (World Test Championship) अंतिम सामन्यात न्यूझीलंडने (New Zealand) सहा दिवसात दणदणीत विजय मिळवला आणि कसोटी अजिंक्यपदाच्या पहिल्या विजेतेपदावर ब्लॅककॅप्सचे (BlackCaps) नाव करेल. पाऊस आणि खराब प्रकाशाने बाधित झालेल्या सामन्याचा निकाल राखीव दिवशी लागला. केन विल्यमसनने पुढाकाराने संघाचे नेतृत्व करत किवी संघाला आयसीसीचे (ICC) पहिले विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. दुसरीकडे, टीम इंडियाच्या (Team India) पदरी पुन्हा निराशाच पडली. गेल्या चारही आयसीसी स्पर्धांमध्ये भारतीय संघाला  (Indian Team) न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यात भारतीय संघाच्या स्टार खेळाडूंकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती पण गोलंदाज वगळता फलंदाजांनी मात्र निराशजनक कामगिरी केली आणि संघाच्या पराभवाचे खलनायक बनले. (IND vs NZ WTC Final 2021: टीम इंडियाने 18 वर्षांची पराभवाची परंपरा यंदाही राखली, कसोटी अजिंक्यपदी न्यूझीलंड विराजमान)

रोहित शर्मा-शुभमन गिल

कोणताही सामना जिंकण्यासाठी सुरुवात चांगली होणे गरजेचे आहे पण भारताला दोन्ही डावात किवी संघाने ती घेऊ दिली नाही. रोहित-शुभमनच्या सलामी जोडीत पहिल्या डावात 62 तर दुसऱ्या डावात पहिल्या विकेटसाठी फक्त 24 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येचा पायाच भक्कम करता आला नाही. शिवाय दोंघांची वैयक्तिक कामगिरी देखील निराशाजनक राहिली. रोहितने अनुक्रमे 34 आणि 30 धावा केल्या तर गिल पहिल्या दावत 28 आणि नंतर फक्त 8 धावाच करू शकला.

विराट कोहली (Virat Kohli)

भारतीय कर्णधार कोहली देखील संघाच्या पराभवाचा मुख्य व्हिलन ठरला. कसोटी अजिंक्यपदाच्या निर्णायक सामन्यात विराटकडून प्रभावी खेळीची अपेक्षा होती मात्र, टीम इंडियाचा कर्णधार दोन्ही डावात चुकीचा फटका खेळत काईल जेमीसनच्या गोलंदाजीवर आपली विकेट गमावली. विराटने पहिल्या डावात 44 आणि दुसऱ्या डावात 13 धावांची खेळी केली.

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत पहिली हॅट्रिक घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या सामन्यात एकही विकेट मिळाली. भारतीय संघाचा 'ट्रम्प कार्ड' असलेला बुमराह दोन्ही डावात अचूक लाईन आणि लेंथने गोलंदाजी करण्यात अपयशी ठरला. टीम इंडियाचा मुख्य वेगवान गोलंदाज असलेल्या बुमराहच्या निराशाजनक कामगिरीमुळे अन्य गोलंदाजांवर दबाव वाढला. बुमराहने पहिल्या डावात 26 ओव्हरमध्ये 57 धावा लुटल्या तर दुसऱ्या डावात त्याने 6 ओव्हर गोलंदाजी करत 19 धावा दिल्या.

चेतेश्वर पुजारा

टीम इंडियाला चेतेश्वर पुजाराकडून बरीच आशा होती पण सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये तो फ्लॉप ठरला. पहिल्या डावात फक्त 54 चेंडूंचा सामना करून त्याने केवळ आठ धावा केल्या आणि दुसऱ्या डावात 80 चेंडूंचा सामना करत त्याला फक्त 15 धावाच करता आल्या.

रवींद्र जडेजा

अंतिम सामन्यात स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाकडून लोकांना खूप अपेक्षा होती पण तो फलंदाजी व बॉलने अपयशी ठरला. जडेजाने दोन्ही डावात फक्त 31 धावा केल्या तर गोलंदाजी करताना त्याला एकच विकेट मिळाली.