IND vs NZ WTC Final 2021: टीम इंडियाने 18 वर्षांची पराभवाची परंपरा यंदाही राखली, कसोटी अजिंक्यपदी न्यूझीलंड विराजमान
विराट कोहली आणि केन विल्यमसन (Photo Credit: PTI)

IND vs NZ WTC Final 2021: विराट कोहलीच्या टीम इंडियाचा (Team India) पराभव करत केन विल्यमसनचा न्यूझीलंड (New Zealand) संघ आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदी विराजमान झाला आहे. केन विल्यमसन (Kane Williamson) 52 धावा आणि रॉस टेलर (Ross Taylor) 47 धावा करून नाबाद परतले. विल्यमसन-टेलरमध्ये तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीने संघाचा विजय निश्चित केला. भारतीय संघाने (Indian Team) दिलेल्या 139 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात किवी संघाने ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून ऐतिहासिक विजयाची नोंद केली. यासह आयसीसी स्पर्धांमध्ये गेल्या 18 वर्षांपासून न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाच्या पराभवाची मालिका यंदाही सुरूच राहिली. यापूर्वी सौरव गांगुलीच्या टीम इंडियाने 2003 वर्ल्ड कप सामन्यात अखेर किवी संघावर विजय मिळवला होता. दुसरीकडे, भारताकडून दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) दोन विकेट्स काढल्या. तसेच फलंदाजीने स्टार खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीनंतर रिषभ पंतने 41 धावांची झुंझार खेळी केली. (IND vs NZ WTC Final 2021: न्यूझीलंडच्या या जिगरबाज खेळाडूने अंतिम टेस्ट सामन्यात दाखवला दम, बोट मोडलं तरी सोडलं नाही मैदान)

भारताचा दुसरा डाव 73 ओव्हरमध्ये 170 धावांवर संपुष्टात आला असून पहिल्या डावातील 32 धावांच्या पिछाडीमुळे भारताने न्यूझीलंडला 139 धावांचे आव्हान दिले होते. दुसऱ्या डावात भारताकडून पंत वगळता रोहित शर्माने 30 धावांचे योगदान दिले तर अन्य कोणालाही 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. न्यूझीलंडकडून साउदीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर ट्रेंट बोल्टने 3, काईल जेमीसनने 2 आणि नील वॅग्नरने 1 विकेट घेतली. दरम्यान या सामन्यात किवी संघाने टॉस जिंकून भारतीय संघाला पहिले फलंदाजी करण्यास बोलावले आणि पहिल्या डावात भारताला 217 धावांवर गुंडाळलं. पहिल्या डावात काईल जेमिसनने 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यांनतर चौथा दिवस पावसामुळे वाया गेल्यावर पाचव्या दिवशी न्यूझीलंड 249 धावांवर ऑलआऊट झाला आणि संघाने 32 धावांची आघाडी घेतली.

भारताने दिवसाच्या शेवटी 64 धावा करत 32 धावांची आघाडी घेतली पण रोहित शर्मा व शुभमन गिलच्या दोन महत्त्वपूर्ण विकेट्स देखील गमावल्या. त्यामुळे सहाव्या दिवशी कर्णधार विराट आणि अन्य फलंदाजांकडून एका चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र कर्णधार विराट कोहली सामना सुरु होताच काही वेळात बाद झाला. त्यानंतर पंत वगळता एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारताचा डाव अवघ्या 170 धावांवर संपुष्टात आला.

दुसरीकडे, यापूर्वी 2007 वर्ल्ड कप टी -20 साखळी सामना, 2016 टी-20 सुपर -10 सामना, 2019 वर्ल्ड कप सेमीफायनल, 2020 किवी देशात WTC अंतर्गत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला ब्लॅककॅप्स विरोधात पराभवाचा सामना करावा लागला आहे. आणि आता देखील कसोटी अजिंक्यपदाच्या निर्णायक सामन्यात न्यूझीलंड संघानेच वर्चस्व गाजवले आहे.