Dhoni चा अखेरचा सामना खेळून झालाय का; MSK Prasad ने केलं हे मोठं विधान
MS Dhoni (Photo Credits: Getty Images)

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) पुन्हा भारताकडून कधी खेळणार हा प्रश्न तमाम चाहत्यांना पडला होता. त्यानंतर येत्या बांग्लादेशविरुद्ध तो 20-20 सामन्याच्या मालिकेसाठी पुनरागमन करणार आहे, अशा चर्चांनाही उधाण आलं होतं. पण संघनिवडीच्या वेळी अध्यक्ष एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे धोनीला पुन्हा भारतीय संघात पाहण्याच्या चाहत्यांच्या आशेला सुरुंग लागले आहेत. प्रसाद यांनी धोनीला वगळण्यात आलं आहे, असे जरी जाहीर केले नसले तरीही त्यांनी दिलेल्या उत्तरांमुळे चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

बांग्लादेशच्या संघनिवडीच्या वेळच्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रसाद म्हणाले,''निवड समितीने या विषयावर चर्चा केली आहे आणि रिषभ पंत वर लक्ष केंद्रित करायचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्ल्ड कप नंतर आम्ही हे स्पष्ट केलं होतं, की आता आम्ही भविष्याचा विचार करत आहोत. आम्ही तरुणांना प्राधान्य देणार असून ते कशी कामगिरी करतात हे बघणार आहोत. रिषभ पंत चांगली कामगिरी करत असताना आणि संजू सॅम्सन सुद्धा बॅक अप म्हणून संघात स्थान मिळवले असताना, तुम्हाला एकंदरीत निर्णय प्रक्रियेचा अंदाज आला असेल.'' (हेही वाचा. Sunny Leone किंवा Mahendra Singh Dhoni यांच्याबद्दल सर्च करणे पडू शकते महागात; तेव्हा राहा जरा सावध)

धोनीशी या विषयावर बोलण्यात आले असून त्याने सुद्धा या निर्णयाचं स्वागत केले असल्याचं प्रसाद पुढे म्हणाले. तसेच यापुढे धोनी घरगुती सामन्यांमध्ये खेळणार का या प्रश्नावर सामने खेळायचे, पुन्हा फॉर्म मध्ये यायचं का निवृत्ती घ्यायची हा धोनीचा वैयक्तिक निर्णय आहे असेही प्रसाद म्हणाले.