Elon Musk (Photo Credits: Getty Images)

इलेक्ट्रिक कार (Electric-Car) बनविणारी जगातील सर्वात मोठी कंपनी टेस्लाने (Tesla) भारतात कर्मचारी भरती करण्यास सुरवात केली आहे. सध्या कंपनी केवळ लीडरशिप पोझिशन आणि वरिष्ठ पातळीवर भरती करीत आहे. सूत्रांनी सांगितले की, अमेरिकन कंपनी जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उदयोन्मुख कार बाजारावर लक्ष ठेवून आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, इलेक्ट्रिक-कार निर्माता कंपनी विक्री प्रमुख, विपणन प्रमुख आणि एचआर हेडच्या शोधात आहे. टेस्लाचे सेलिब्रिटी मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क (Elon Musk) यांनी यावर्षी टेस्ला भारतात प्रवेश करणार असल्याची पुष्टी केली आहे.

जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीने 13 जानेवारी रोजी एका ब्लॉग रिपोर्टला उत्तर देताना सांगितले की, टेस्ला भारतात कार्यालये, शोरूम, संशोधन व विकास केंद्रे आणि शक्यतो कारखाना उघडण्यासाठी अनेक राज्यांशी चर्चा करीत आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारी महिन्यात सांगितले की, टेस्लाने आपल्या भारतामधील पहिल्या प्लांट साठी कर्नाटकची निवड केली आहे.

अशीही बातमी होती की, टेस्लाने भारतांमधील प्रमोशन बॉडी इन्व्हेस्ट इंडियाचे माजी कार्यकारी मनुज खुराना यांना आपले लॉबिंग आणि बिझनेसचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त केले होते. कंपनीने निशांतला चार्जिंग मॅनेजर म्हणून नेमले आहे, जो टेस्ला इंडियासाठी सुपरचार्जिंग, डेस्टिनेशन चार्जिंग आणि होम चार्जिंग व्यवसायाचे नेतृत्व करेल. टेस्ला फॅन क्लबने गेल्या आठवड्यात ट्विट केले होते की कंपनीने आपल्यासोबत वरिष्ठ कायदेशीर सल्लागार आणला आहे. टेस्ला येथे गेल्या चार वर्षांपासून सेवा करणारे प्रशांत मेनन यांची कंट्री सीईओ म्हणून पदोन्नती झाल्याची बातमी गेल्या महिन्यात आली होती. (हेही वाचा: Audi लवकरच घेऊन येणार आपली पहिली इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जमध्ये 400km अंतर कापणार)

इलेक्ट्रिक गाड्यांवरील जीएसटी बदलांबाबत भारत सरकारच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत सध्या कंपनी आहे. जीएसटी कमी झाल्याने इलेक्ट्रिक कार खरेदी करणे सोपे होईल. मीडिया रिपोर्टनुसार, टेस्ला कंपनी राजधानी नवी दिल्ली, पश्चिमेकडील आर्थिक केंद्र मुंबई आणि दक्षिणेतील तांत्रिक शहर बेंगलुरूमध्ये शोरूम आणि सेवा केंद्रे उघडण्यासाठी 20,000-30,000 चौरस फूट कमर्शिअल प्रॉपर्टीजच्या शोधात आहे.