वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वॅन ब्राव्होने तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. विंडीजच्या या 35 वर्षीय खेळाडूने आपल्या निवृत्तीसंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे, या पत्रकात त्याने आपण निवृत्त होत असल्याचे म्हटले आहे. सध्या भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये चाललेल्या सामन्यांच्या सिरीजमध्ये ब्राव्होला स्थान देण्यात आले नव्हते म्हणूनही त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
ब्राव्होने एप्रिल 2004 साली क्रिकेट विश्वामध्ये पाऊल ठेवले होते. त्याने विंडीजकडून सप्टेंबर 2016 मध्ये अखेरचा सामना खेळला होता. ब्राव्होने एकूण 270 आंतरराष्ट्रीय सामन्यांत विंडीज संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2004 ते 2016 दरम्यानच्या वेस्ट इंडिजच्या दोन ट्वेंटी-20 विश्वचषक विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
तरुण पिढीला संधी देण्यासाठी आपण निवृत्त होत असल्याचे त्याने सांगितले. एक व्यवसायिक क्रिकेटपटू म्हणून अनेकांनी जो निर्णय घेतला तो मीही घेणे गरजेचे आहे. म्हणूनच मी नवीन खेळाडूंना संधी देण्यासाटी क्रिकेटचे मैदान सोडत असल्याचे ब्रोव्हो म्हणाला आहे. मात्र त्याने व्यवसायिक क्रिकेट खेळत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगसारख्या स्पर्धांमधून ब्राव्होचा उत्कृष्ट खेळ अनुभवता येणार आहे.
ब्राव्होची कारकीर्द
> कसोटी क्रिकेट – 40 सामने
> एकदिवसीय क्रिकेट – 164 सामने
> टी-20 - 66 सामने
सर्वोत्तम कामगिरी – 28 धावांत 4 बळी